Pune : अभिरूप संसद स्पर्धेत पूना महाविद्यालय विजेता

एमपीसी न्यूज – अभिरूप संसद आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पूना महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावित स्पर्धा जिंकली.

एच.वी. देसाई महाविद्यालयातर्फे आयोजित या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. पूना महाविद्यालयास उत्कृष्ट संघ, वैयक्तिक पातळीवर हाशीम अंसारी यास उत्कृष्ट वक्ता, जहानआराला उत्कृष्ट वक्ती-सत्ताधारी पक्ष, फैजान तबीश यास उत्कृष्ट वक्ता-विरोधी पक्ष ही पारितोषिके मिळाली. महाविद्यालयाच्या संघात एकूण 30 विध्यार्थी सहभागी झाले होते.

पूना महाविद्यालयाच्या संघाने अभिरूप संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या कामकाजाचे सादरीकरण केले. यात नवीन सदस्याचा शपथविधी, श्रद्धांजली, विधेयक मांडणी, विधेयकावर चर्चा व मतदान, प्रश्नकाळ, लक्षवेधी सूचना अशा विविध संसदीय आयुधाचा वापर करत अभिरूप संसदेचे सादरीकरण केले. अभ्यासपूर्ण सादरीकरण, ज्वलंत समस्येवर चर्चा, संसदीय शिस्तीचे काटेकोर पालन करत लोकशाहीमध्ये संसदेचे महत्व आपल्या सादरीकरणात पटवून दिले.

पूना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, उपप्राचार्य प्रा. मोईनूद्दीन खान यांनी संघाचे उत्साह वाढवीत मार्गदर्शन केले. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. मुखतार शेख यांनी सहभागी विध्यार्थ्यांना सदर स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन करत संघ यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अहमद शमशाद हेही यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.