Weather News : नवीन वर्षाच्या आगमनाबरोबर होणार थंडीचेही पुनरागमन

एमपीसी न्यूज : शहर परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वाढत असला, तरी गारवा कायम आहे. शहरात थंडीचा कडाका फारसा जाणवत नसला, तरी पुढील दोन ते तीन दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला थंडीचेही पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रविवारी शहरात 13.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे प्रमाण सरासरीपेक्षा तीन अंशांनी जास्त आहे. हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे.

तसेच हिंदी महासागर आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भाग व बंगालचा उपसागर व परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा तयार होत असल्याने राज्यातील काही भागांत हवामान किंचित ढगाळ आहे. यामुळे थंडी कमी-जास्त होत आहे.

दरम्यान, जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. तेथील तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने घसरले आहे. तेथून राज्याच्या दिशेने वाहणाऱया थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागात थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.