Vadgaon Maval News :तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या पुढाकारातून पाणंद रस्ते होणार खुले 

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील 80 ग्रामपंचायत हद्दीतील 196 पाणंद रस्ते महसूल व लोकसहभागातून खुले करून दुरूस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील 14 रस्त्यांची कामेही सुरू करण्यात आली आहेत. या मोहिमेस शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

शेतक-यांना स्वतः च्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, विविध यंत्रसामुग्री ने-आण करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बहुतांश ठिकाणी केवळ रस्ता नाही म्हणून पिके घेता येत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने पालकमंत्री शेत- पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे.

रस्त्याअभावी शेतकरीवर्गाची होणारी अडचण दूर करण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून मावळ तालुक्यातील पाणंद रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने खुले व दुरुस्त करण्यात येणार आहेत. यामध्ये 80 ग्रामपंचायत हद्दीतील 196 पाणंद रस्त्यांचा समावेश असून त्यांची लांबी सुमारे 247.92 किलोमीटर इतकी आहे.

पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या 18.350 किलोमीटर अंतराच्या 14 रस्त्यापैकी आंबळे, औंढोली, कोथुर्णे, शिवणे, आढले बु,साई, चिखलसे, साते, साळुंब्रे, माळवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील पाणंद रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत. तर सुदवडी, करंडोली, येलघोल, महागाव येथील प्रत्येकी एक व बेबडओव्हळ येथील दोन अशा सहा रस्त्यांची कामे सद्यपरिस्थित सुरू असून लवकरच पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

वर्षानुवर्षे अतिक्रमणे किंवा काही अडचणीमुळे बंद असलेले, रस्ता असूनही वापरण्यायोग्य नसल्याने बंद असलेले रस्ते या योजनेच्या माध्यमातून महसूल प्रशासन व लोकसहभागातून वाहतुकीच्या दृष्टीने खुले होत असल्याने शेतकरी आनंदी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.