Talegaon Dabhade: मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने आता गावात येण्या-जाण्यासाठी पाच किलोमीटरचा वळसा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मुख्य प्रवेशद्वार (लिंबफाटा) येथून रस्ता बंद करण्यात आला आहे. तळेगावात यापुढे येण्यास व जाण्यास फक्त वडगावफाटा-चाकण रस्त्याचा एकमेव पर्याय ठेवण्यात आला आहे. तळेगावात वाढलेली घुसखोरी व अपुरे पोलीस कर्मचारी यामुळेच  मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी असा निर्णय तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत जाहीर केला. 

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात काल (मंगळवारी) दुपारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार लिंब फाट्याजवळील सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे मुख्य प्रवेशद्वार दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वांना वडगाव फाटा- चाकण मार्गे पाच किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.

याबैठकीला तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे माजी अध्यक्ष महेश महाजन, पत्रकार गणेश बोरूडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, संविद पाटील, प्रमोद देशक, अॅड देवीदास टिळे आदी उपस्थित होते.

रेडझोन असलेल्या क्षेत्रातून येण्यास अटकाव व्हावा व कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार लिंब फाट्याजवळील सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना देखील येथून आत येण्यास आणि बाहेर पडण्यास अटकाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता अशा सर्वांना वडगाव फाट्यावरून 5 किलोमीटरचा मोठा वळसा मारवा लागणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी देखील मुख्याधिकारी यांच्या या निर्णयावर कोणतीही चर्चा न करता बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी केली.

पुरेसे पोलीसबळ नसल्याने मदतनीस म्हणून 20 ते 25 स्वयंसेवकांची नेमणूक (तात्पुरती) करण्यात आली आहे. तळेगावात पाच ते सहा चेक पाॅईंट असून एका चेक पाॅईंटवर चारजण काम करतील. त्यामध्ये 3 स्वयंसेवक व एक पोलीस कर्मचारी राहणार आहे. ते स्वयंसेवक एका दिवसात चार तास काम करणार आहेत.

तळेगावात येण्या- जाण्यासाठी एकच प्रवेश ठेवला असून बाकी सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. मावळ तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन व तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासन यांच्या सहमतीने  हा निर्णय घेण्यात आला आहे. लाॅकडाऊन संपेपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.

हा सर्व खटाटोप तळेगावकरांच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी असून सर्वांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.