Pimpri : करदात्यांचे पैसे खासगी बँकेत कोणाच्या परवानगीने ठेवले?, शिवसेनेचा सवाल

महापालिकेच्या आर्थिक बाबींचे जाहीर प्रगटन करा, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांची मागणी

एमपीसी न्यूज – खासगी क्षेत्रातील येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर रुपातून गोळा झालेले 984 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. नागरिकांच्या कर रुपातून जमा झालेले पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे बंधनकारक असताना महापालिका नियम, कायद्याच्या आधारे व सक्षम अधिकारी वर्ग, स्थायी समिती, महापालिका सर्वसाधारण सभा यांच्या मंजुरी व सहमतीने ठेवण्यात आले होते का ? याबाबत महापालिकेने खुलासा करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात चिंचवडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. महापालिकेने ठेवी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या आजमितीला किती ठेवी आहेत? कोणत्या-कोणत्या बँकेत ठेवी ठेवल्या आहेत? या रकमांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का? महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय आहे? नागरिकांच्या कररुपाने उभा राहिलेला पैसा जपणे महापालिकेचे कर्तव्य आहे. करदात्यांचा पैसा कोणाच्या घशात जाऊ नये याची महापालिकेने दक्षता घेणे आवश्यक आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणाची सखोल चौकशी होऊन कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिक शिस्त व नियमाने चालल्यास त्याचा भविष्यात विकासकामांवर चांगलाच परिणाम होईल. त्यामुळे आयुक्तांनी करदात्या नागरिकांना त्याचे जाहीर प्रगटन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, येस बँकेत करदात्यांचे एक हजार कोटी अडकले आहेत. या संशयास्पद गैरव्यहारांची सखोल चौकशी होऊन संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.