Maval News : सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून सोमवारी मावळात महालसीकरण अभियान

18 हजार लस होणार उपलब्ध

एमपीसी न्यूज – आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून मावळातील वडगाव, कामशेत व सोमाटणे या ठिकाणी सोमवारी (दि.13) महालसीकरण अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत वडगाव, कामशेत व सोमाटणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर सर्व लसीकरण केंद्रांवर तब्बल 18 हजार कोविड प्रतिबंधात्मक लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत.

वडगाव,कामशेत व सोमाटणे येथील सर्व नागरीकांनी सोमवारी (दि.13) जवळच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार शेळके यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना काळात हॉटस्पॉट ठरलेली मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत व सोमाटणे ही वाढत्या नागरिकीकरणाची गावे असून तालुक्यातील बाजारपेठेची ठिकाणे देखील आहेत.

या ठिकाणी होणाऱ्या वर्दळीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना कोरोना  विषाणूची प्रतिबंधात्मक लस देणे गरजेचे असल्याने आमदार शेळके यांनी तालुक्यातील नागरिकांच्या लसीकरणावर विशेष लक्ष देऊन यासाठी जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करून मावळसाठी 18 हजार लसीचे डोस उपलब्ध केले आहेत.

सोमवारी वडगाव,कामशेत व सोमाटणे या भागात महालसीकरण अभियान राबवून तेथील लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये वडगावसाठी 5 हजार, कामशेतसाठी 5 हजार सोमाटणेसाठी 3 हजार तर मावळातील इतर गावांसाठी 5 हजार असे एकूण 18 हजार लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. यामध्ये नागरिकांना पहिला व दुसरा असे दोन्ही डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुक्यात मोठया प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांना देखील कोरोनापासून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत मावळातील 2 लाख 60 हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून लवकरच मावळातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.