Lonavala : अवघ्या 24 तासात तब्बल 375 मिमी पाऊस (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 24 तासात शहरात तब्बल 375 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारची रात्र ते शनिवारचे पहाटे दरम्यान पडला आहे.

मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांगरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली भागातील काही सोसायट्यांना पाण्याचा विळखा पडला आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्याने कार्ला व मळवली भागातील अनेक सोसायट्यांना पुराचा विळखा पडला आहे. सांगिसे व नाणे पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सर्वत्र पूरसदृष्य स्थिती असून पावसाची संततधार कायम असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

भुशी धरणाच्या सांडव्यावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने धरणाच्या पायर्‍यावर जाणे धोकादायक झाले आहे. शुक्रवारी पायर्‍यावर अडकलेल्या सहा पर्यटक‍ांनी स्थानिक दुकानदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले. लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांनी या धोक्याची नोंद घेत धरणाच्या पायर्‍यांवर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तळेगाव शहरातील अंडरपास पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला असून या मार्गाचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.