BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : इराणी गँगची सराईत महिला चोर जेरबंद

गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून महिलांना त्यांचे दागिने रुमालात अथवा लिफाफ्यात ठेवण्यास सांगून ते दागिने सराईतपणे चोरणारी महिला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकली. ही महिला इराणी गँगची सदस्य असून तिच्यावर महाराष्ट्र राज्यासह इंदोर, भोपाळ, डेहराडून येथे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी तिला अटक केली आहे.

फीजा सरफराज जाफरी उर्फ इराणी असे अटक केलेल्या सराईत महिलेचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना माहिती मिळाली की, भिवंडी, कल्याण, ठाणे या भागात सराईतपणे मंगळसूत्र चोरी करणारी तसेच चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट लावणारी सराईत महिला दापोडी भागात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून इराणी या महिलेला पाटील इस्टेट भागातून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या महिलेकडे चौकशी केली असता तिच्यावर मनपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई केली असून ती मागील दीड वर्षापासून पोलिसांना चकमा देत असल्याचे समजले. तसेच कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तिच्यावर चोरीचा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले. यावरून तिला अटक करण्यात आली. महिलेला पुढील कारवाईसाठी महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सराईत चोर महिलेवर अंबाझरी नागपूर, कल्याण, भिवंडी, ठाणे तसेच महाराष्ट्राबाहेर इंदोर, भोपाळ, डेहराडून येथे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तिला 15 गुन्ह्यात अटक झाली असून दोन गुन्ह्यात ती फरार आहे. ही महिला पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना त्यांचे दागिने एखाद्या लिफाफ्यात अथवा रुमालात बांधण्यास सांगत असे. नागरिकांनी लिफाफ्यात अथवा रुमालात बांधलेले दागिने ती सराईतपणे चोरून नेत. तसेच चोरलेल्या दागिन्यांची विल्हेवाट देखील लावत असे. या सराईत महिलेस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप चौधरी, संजय पंधरे, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, वसंत खोमणे, विपुल जाधव, मुंडे, कुडके, सानप, राऊत यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like