Nashik: सॅनिटाइझ करताना मेणबत्तीचा भडका उडाला, महिला ठार

वीजपुरवठा खंडित झाल्याने रजबिया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाइझ करत होत्या.

एमपीसी न्यूज- घर सॅनिटाइझ करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. नाशिकमधील वडाळा गावात मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटाइझ करताना भडका उडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 90 टक्के भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान चार दिवसांनी मृत्यू झाला.

रजबिया शाहिद शेख (24) असे मृत विवाहितेचे नाव आहे. धुणी-भांडी करणाऱ्या रजबिया शेख या वडाळा गावातील मेहबूबनगरमध्ये गरीबनवाज मशिदीच्या बाजूला असलेल्या एका चाळीत पती शाहिद मुलगी अक्सा (3), मेहजबीन (6) यांच्यासोबत राहत होती. शाहिद हे मजूर आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने रजबिया शेख यांनी घरात मेणबत्ती लावली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याच वेळी त्या आपले घरही सॅनिटाइझ करत होत्या. त्याच वेळी आगीचा भडका उडाला आणि रजबिया शेख भाजल्याची घटना घडली.

त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रजबिया यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.