Pune : उद्योगांतील रणरागिणींचा वुमन हाईककडून सन्मान

एमपीसी न्यूज – स्वतःच्या बळावर उद्योग व्यवसाय स्थापन करून नावलौकिक मिळविलेल्या महिलांचा पुण्यातील वुमन हाईक सामाजिक संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला आहे. टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात आयोजित ‘पॉवर मीट 2019′ कार्यक्रमात इफ्कोच्या संचालिका साधना जाधव यांच्या हस्ते उद्योग क्षेत्रातील रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. यावेळी वुमन हाईक संस्थेच्या अध्यक्षा सुजाता मेंगाणे यांनी महिला उद्योजिकांसाठी नव्याने कार्यरत होत असलेल्या अवेक फाउंडेशन या संस्थेची उद्घोषणा केली आहे.

यावेळी सुजाता मेंगाणे, प्राजक्ता जोशी आणि कैलास म्हैसेकर यांच्या संयुक्त विद्यमाने अवेक उद्योजकता विकासाचे कार्य करेल. उद्योजक होऊ पाहणाऱ्या महिलांना अवेक फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याविषयी प्रशिक्षण, साधने, आर्थिक, मार्केटिंग याबाबत पाठबळ देण्याचे प्रयोजन आहे. या प्रसंगी रचना सारंग पाटील, नुपुर पवार, गौरी ढोले पाटील, निश्रिन पूनावाला, हीना करणानी आदी उपस्थित होते.

‘महिलांसाठी उद्योजकतेतील संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादात महिलांनी झोकून देऊन उद्योग क्षेत्रात यावे. आज संधी भरपूर आहेत. त्यांचा फायदा घ्यावा. आपल्यातील ज्ञान अद्ययावत करीत आपला व्यवसाय वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. नवीन उद्योग सुरू केल्यावर व्यवसाय वाढीसाठी किमान तीन वर्षे धीर धरावा. या परिसंवादात प्रसाद कुलकर्णी, अंशुल बाफना, मॅथ्यू मत्तम, रिदिमा दुआ, भावना अंबुडकर, प्रणिता साळूंखे यांनी सहभाग घेतला आहे.

प्रास्ताविक करताना संस्थेच्या अध्यक्षा सुजाता मेंगाणे यांनी महिलांनी उद्योग, व्यवसायात यावे, यासाठी वुमन हाईक संस्था निःस्वार्थपणे करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली. अनेक महिला नेमके काय करायचे हे सुचत नसल्याने विचलित झालेल्या असतात. पण त्यांना थोडेसे प्रोत्साहनही उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पुरेसे ठरते. वुमन हाईक हा कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून महिला एकमेकांसोबत उभ्या राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे .

उद्योगात नव्याने पदार्पण केलेल्या महिलांना मार्गदर्शन करताना साधना जाधव यांनी सांगितले, की महिलांनी निर्भर बनून आपले अधिकार वापरले पाहिजेत. मागितल्याने कुणी देणार नाही, त्यामुळे महिलांनी आपल्या हक्कांसाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे. मोठे ध्येय ठेवले तर काहीही अशक्य नाही, असे सांगताना जाधव यांनी आपल्या जीवनात आलेले चढउतार व त्याला तितक्याच धैर्याने कसे तोंड दिले हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. महिलांनी घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडण्यासाठी आपली मानसिकता बदलायला हवी. महिला ही सबला असते फक्त तिला स्वतःला  तिच्या शक्तीची जाणीव होणे महत्त्वाचे असते.

पॉवर वुमन पुरस्कार मिळालेल्या पल्लवी जैन यांनी त्यांचा क्रस्ना डायग्नोस्टिकचा प्रवास उलगडला. गिरीजा शिंदे, शारदा विनोद दातिर यांनी केवल दहा मुले ते तीनशे मुले असा त्याच्या गुरूकुल फाउंडेशनची प्रगती सांगितली. मधमाशापालन करून फाॅरेस्ट हनी प्रकल्प चालवत असणा-या रोहिणी पाटील यांनाही या सन्मानाने गौरवण्यात आले.

पिनल वानखेडे, दीपाली सोनजे, डाॅ. हर्षा सेठ, झिलमिल कोचर, श्वेता देसले, सुनिता कुलकर्णी, डाॅ. रूपाली ढमढेरे, निराली सोमय्या यांचाही गौरव करण्यात आला. कुहु गुप्ता, कमरताज पठाण, सबीना साळवे, स्नेहा लुगडे, कल्पना गारे, कविता पोळ, राधिका कुलकर्णी, सरिता काकडे, सायली शेंडे, नयना बर्डे, पल्लवी हिंगणे, प्रीती साखरे, राखी जैन, देवयानी तांबोळी यांचाही सत्कार करण्यात आला. नुपुर पवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.