Chinchwad : हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणी विमेन हेल्पलाईनने केले सर्व पोलीस बांधवांचे अभिनंदन!

एमपीसी न्यूज – हैद्राबाद बलात्कार व खून प्रकरणातील पळून जाणाऱ्या चारही आरोपींना एन्काऊंटर करून यमसदनास पाठवून मृत पीडितेस न्याय मिळवून दिल्याबद्दल विमेन हेल्पलाईन या संस्थेने देशातील सर्व पोलीस बांधवांचे अभिनंदन केले. या चकमकीच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्यांचा विमेन हेल्पलाईनने निषेध केला आहे.

विमेन हेल्पलाईनच्या संस्थापक अध्यक्ष नीता परदेशी तसेच अॅड. सारिका परदेशी, अॅड. आश्लेषा थोरवे, अनिता सोनवणे, रेश्मा निमकर, आम्रपाली किरते, गौतमी पारडे, नंदा खरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस सहआयुक्त प्रकाश मुत्याल, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक अभिनंदन केले.

हैद्राबाद बलात्कार प्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे महिलांमध्ये पोलीस दलाबद्दलचा विश्वास वाढला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर जरब बसविण्याचे काम पोलिसांनी केल्यामुळे महिलावर्गात सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होईल, अशा भावना नीता परदेशी यांनी व्यक्त केल्या.

एन्काऊंटरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासारखे आहे. मूळ विषयाला फाटा फोडून आरोपींना सहानुभूती मिळवून देण्याचा प्रयत्न काहीजण करत असून तो निषेधार्ह आहे, असेही नीता परदेशी म्हणाल्या. विमेन हेल्पलाईन महिला संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस बांधवांच्या पाठीशी सदैव राहील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.