Yavatmal : तब्बल 17 वर्षांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिला 

अध्यक्षपदी लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांची निवड

एमपीसी न्यूज – यवतमाळ येथे होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. 11 ते 13 जानेवारीदरम्यान यवतमाळमध्ये संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्षपदी कोण असेल याबाबत साहित्य वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अमरावतीच्या ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचे नावही अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. प्रभा गणोरकर यांनी याआधीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले होते.
यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला गेला नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे.

साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत.
1961 साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, 1975 साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत,1996 साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि 2001 साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी 2018 सालच्या यवतमाळ येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.