Women’s Day : विस्मृतीत गेलेल्या पंडिता रमाबाई

एमपीसी न्यूज – (रंजना बांदेकर) – स्वातंत्र्यपूर्व काळात (Women’s Day) होऊन गेलेल्या अनेक कर्तुत्ववान स्त्रिया आता विस्मृतीत गेल्या आहेत. त्यापैकीच एक पंडिता रमाबाई. त्यांनी केलेले कार्य खूप महान होते; पण त्यांचे नाव काळाच्या पडद्याआड गेले. महिला दिनानिमित्त त्यांच्या विषयी आपण जाणून घेऊया.

पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्यांनी मुलीला वेदशास्त्राचे शिक्षण दिले. त्या काळच्या प्रथेप्रमाणे रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या तरी त्यांचे लग्न केले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले गेले. वडिलांनी मुलीला फक्त शिक्षणच दिले नाही, तर लग्नासाठी दबावही आणला नाही. त्यामुळे त्या संस्कृतमध्ये पारंगत झाल्या. त्यामुळे त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ ही बिरुदावली मिळाली.

आई-वडिलांच्या व भावाच्या निधनानंतर त्यांनी 22 व्या वर्षी बिपीन चंद्र मेधावी यांच्याशी लग्न केले. पण पतीचे दोनच वर्षात निधन झाले. पुण्यातील सुधारकांच्या आग्रहावरून त्या आपल्या मुलीसह पुण्यात आल्या व येथे त्यांनी स्त्रियांसाठी अनेक चळवळी सुरू केल्या.

स्त्रियांनी नऊवारी साडी सोडून पाचवारी साडी नेसावी; कारण त्यात वेळ व पैसा दोन्ही वाचतो आणि ते सोयीचे होते म्हणून स्त्रियांचे त्यांनी प्रबोधन केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. इंग्रजी (Women’s Day) भाषा व वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी त्या इंग्लंडला गेल्या. त्याचा प्रवास खर्च त्यांनी आपल्या एका पुस्तकाच्या विक्रीतून केला. त्या स्वतःही खूप शिकल्या व आपल्या मुलीलाही शिकवले. मुलगीही शिकून त्यांच्या समाजकार्यात सहभागी झाली. ती ब्रेल लिपी शिकली व इथल्या अंध भगिनींसाठी काम करू लागली.

स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी ‘शारदा सदन व मुक्ती सदन’ अशा संस्था काढल्या. यामध्ये शेती, विणकाम, मुद्रण कला, यासारख्या कला शिकवल्या जात. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट आणि धाडस या गुणांवर समाज क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे निधन 5 एप्रिल 1922 रोजी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.