Pimpri : महिलांचे मनोधैर्य आणि क्षमतांचा विकास दिवसेंदिवस वाढायला हवा – स्मिता पाटील

जागतिक महिला दिनानिमित्त 'अभया ते निर्भया' परिसंवाद

दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांचा उपक्रम

योगेश मालखरे यांचा विशेष सत्कार

एमपीसी न्यूज – महिलांमध्ये अनेक शक्तींचा वास आहे. पण तिच्यातील शक्ती बाहेर येण्यासाठी अनेक गोष्टींचा अडथळा येतो. तो अडथळा दूर करून महिलांनी आपले मनोधैर्य वाढवावे. त्यांच्यातील सुप्त क्षमतांचा दिवसेंदिवस विकास व्हायला हवा. त्यातून त्यांच्या प्रगतीचे नवे क्षितिज उजळू लागेल, असे मत पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभया ते निर्भया’ या विषयावर परिसंवाद साधण्यात आला. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक स्मिता जोशी, लेखिका आश्लेषा महाजन, कौटुंबिक समुपदेशक डॉ. सागर पाठक यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. आदित्य दवणे यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात निराधारांचा आधार असलेले योगेश मालखरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृषा गावडे, शर्मिला महाजन यांनी केले.

स्मिता पाटील म्हणाल्या, “पोलीस म्हणून काम करताना संवेदना बाळगून पण त्या न दाखवता काम करावं लागतं. प्रत्येक पीडित व्यक्ती, महिलेला न्याय मिळायला हवा हाच पोलिसांचा आणि एकंदरीत न्याय व्यवस्थेचा उद्देश असतो. हुंडा, घरगुती हिंसा अशा घटनांमध्ये अनेकदा महिलाच जबाबदार असतात. हे अतिशय विकृत आहे. घरातील टीमवर्क महत्वाचं आहे. सासू आणि सून यांच्यामध्ये होणाऱ्या भांडणात दोघी बरोबर असतात, पण त्या कॉम्प्रमाईज करायला तयार नसतात. त्यासाठी त्यांच्यात सलोखा निर्माण व्हायला हवा. स्त्रीचे धैर्य आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास दररोज व्हायला हवं.

स्मिता जोशी म्हणाल्या, “समुपदेशन करणे ही तारेवरची कसरत आहे. अनेक संस्थांच्या मदतीने हे काम केलं जातं. बदनामी होण्याच्या भीतीमुळे पीडित मुलींचे पालक तक्रार नोंदवत नाहीत. बदनामी होऊ नये, एवढाच पालकांचा उद्देश असतो. त्यातून प्रकरणे दाबली जातात. त्यामुळे काही घटनांमध्ये अपराध्यांपर्यंत न्याय यंत्रणा पोहोचत नाही. परिणामांचा विचार न करता केलेल्या चुकांचा शेवट पाश्चातापावर होतो. आजच्या पिढीला क्षणिक आणि स्वकेंद्रित सुखासाठी ओरबाडण्याची सवय लागत आहे. मुलांच्या चुका घरचे सुद्धा अनेकदा मान्य करत नाहीत. महिलांनी पुरुषांच्या कायम विराधात राहणं म्हणजे कायद्याचं राज्य नव्हे. सर्वांनी समानतेने राहायला हवे. स्त्रीने स्वतःचे आत्मभान जागृत करायला हवे.

आश्लेषा महाजन म्हणाल्या, “साहित्यात समाजाचे प्रतिबिंब आढळते. पुरुष धार्जिणी स्त्री साहित्यात अनेकदा बघायला मिळते. महिलेला पुरुषांच्या प्रगतीतील धोंडा मानला जायचा. एकोणिसाव्या शतकात स्त्री खऱ्या अर्थाने तिच्या उद्धारासाठी लिखाण करू लागली. मालती बेडेकर, दुर्गा बेडेकर या लेखिका त्या पंक्तीतल्या आहेत. साहित्यातून आणखी चांगलं वास्तववादी, मूलभूत पद्धतीचं लेखन व्हायला हवं. स्त्री आणि पुरुष या दोघांनी एकमेकांचे गुण घेऊन वाटचाल करावी. विवेकवादी दृष्टिकोनातून अपली मतं परखडपणे मांडायला हवा.

डॉ. सागर पाठक म्हणाले, “लैंगिक साक्षरता शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. पालकांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ‘तुला मोठा झाल्यावर समजेल’ असं म्हणून अनेकदा पालक आपली जबाबदारी झटकतात. चुका होणार नाहीत, नकळत चुका झाल्या तर त्या मान्य करून योग्य समुपदेशन करायला हवे. फेमिनिजम ही संकल्पना अलीकडे खूप चर्चिली जाते. पुरुष जे करतात ते स्त्रीने करणं म्हणजे स्त्री मुक्ती नाही, तर आपल्यातली ऊर्जा ओळखून जगणं म्हणजे स्त्री मुक्ती आहे. उपाधी विरहित स्त्री होणं हे स्त्रीला मिळालेलं सर्वात मोठं योगदान असेल.

योगेश मालखरे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, “दररोज अनेक गरजू लोक भेटतात. त्यांना सेवा देण्यास मनस्वी आनंद होतो. विशेष सत्कार करून आयोजकांनी आणखी मोठी जबाबदारी दिली आहे.

सिद्धी देवा म्युझिक आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या सिद्धिदेवा आर्ट अँड कल्चरल  फाऊंडेशनच्या विठ्ठल वैद्य, संजय वरदा, शिवाजी जगताप, चांदसाहेब शेख, विद्यासागर गायकवाड, अपर्णा सोले, प्रसन्न सोले, साधना पंडित, चंद्रशेखर जोशी आदी कलाकारांनी भावगाणी सादर केली. ज्योती कानेटकर आणि मैत्रिणी यांनी ‘अभया ते निर्भया वेगळा दृष्टिकोन’ हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात महिलांवर आधारित कथा, कविता, गाणी सादर करण्यात आली. सिटी प्राईड शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘नारीचा सन्मान हाच देशाचा अभिमान’ हे पथनाट्य सादर केले.

जागतिक महिला दिनानिमित्त ‘अभया ते निर्भया’ या विषयवार घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धा घेण्यात आली. महिलांच्या संदर्भातील स्थित्यंतरांबाबत अनेकजण शब्दातून व्यक्त झाले. 18 ते 25 या गटात आर्या उंब्रजकर(प्रथम), मोनिका बोरसे(द्वितीय), जागृती भंडारे(तृतीय), 26 ते 50 या गटात अपर्णा देशपांडे(प्रथम), अंजली सूर्यवंशी(द्वितीय), प्रज्ञा पाटील(तृतीय) आणि विशेष पुरस्कार रेखा देशपांडे (प्रथम), उर्मिला पाटील (द्वितीय), मनीषा सोनी (तृतीय) आदींनी बक्षिसे पटकावली.

दुर्गेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अमित गावडे, अनुष्का स्त्री कला मंचच्या अध्यक्षा शर्मिला महाजन, विनिता देशपांडे, गीता कदम, मंजुषा देशपांडे, दीपा चिरपुटकर, वृंदा गोसावी, हिमाली प्रधान, अनुजा दोषी, सुनंदा सुपनेकर, समृद्धी पैठणकर, शामल जम्मा, अरुषा शिंदे, उषा गर्भे, स्वाती धर्माधिकारी, सुरेखा भालेराव, स्नेहल भिंगरकर, ज्योती देशमुख, डॉ. माधवी महाजन यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.