Khed News : ‘वर्क फॉर इक्वॅलिटी’तर्फे मासिकपाळी स्वच्छता, शाश्वत पर्याय यावर गावांमधील मुलींना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेतर्फे ग्रामीण भागातील मुलींना मासिकपाळी स्वच्छता आणि शाश्वत पर्याय या विषयावर  मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये कपड्याचे पॅड व मासिकपाळी कप या पर्यावरण पूरक पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली 

28 मे मासिक पाळी दिन म्हणून संपूर्ण जगभरात पाळला जातो. त्या निमित्ताने मासिकपाळी विषयी समाजातील नकारात्मकता कमी व्हावी व या विषयाशी संबंधित प्रश्नांवर प्रकाश टाकावा या उद्देशाने वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेने विविध उपक्रम आयोजित केले होते.

खेड तालुक्यातील शाळांमध्ये मासिक पाळीच्या सुविधांमध्ये सुधार व्हावी म्हणून गेल्या वर्षभरापासून संस्थेशी संबंधित युवती काम करत आहेत. एका अभ्यासादरम्यान खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये मासिकपाळीसाठी आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनात आले.

यावर शाळांमध्ये सुविधा निर्माण व्हाव्यात तालुका स्तरापासून जिल्हा व राज्यस्तरापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांसमोर मुलींनी आपले प्रश्न मांडलेले आहे. यासंदर्भात खेड तालुक्यातील 133 जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये मासिकपाळी सुविधा मिळाव्यात म्हणून खेड पंचायत समितीने 15 व्या वित्तआयोगातून निधी मिळावा म्हणून ठराव मांडला होता.

या विशेष दिनी खेड तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीना संस्थेशी संबंधित युवतींनी निवेदने दिली. 15 व्या वित्तआयोगातून शाळांमध्ये मासिकपाळी व्यवस्थापनाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी विनंती करण्यात आली. बऱ्याच अधिकाऱ्यांनी युवतींना आश्वासक प्रतिसाद दिला, असे संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.