Pune News : आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, अमित शहा यांच्या हस्ते होणार लोकार्पण

एमपीसी न्यूज : दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील ‘शिवसृष्टी’  प्रकल्प पुण्यातील नऱ्हे-आंबेगाव येथे साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा (Pune News) अर्थात ‘सरकारवाडा’ पूर्ण झाला आहे. येत्या 19 फेब्रुवारी रोजी, शिव जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे. 

‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्पा असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही ऐतिहासिक घटना एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभूती देखील मिळणार आहे.

‘शिवसृष्टी’ एकूण चार टप्प्यात उभारण्यात येणार असून प्रकल्पाचा खर्च साधारण 438 कोटी रुपये इतका आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत उत्स्फूर्तपणे देणगीदारांकडून 60 कोटी रुपये या प्रकल्पाला मिळाले आहेत ज्याचा उपयोग पहिल्या टप्प्याच्या उभारणीत करण्यात आला आहे. (Pune News) त्या बरोबरच ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी देखील उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या 12 हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून निधी उभा केला या सगळ्यांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला आता मूर्त स्वरूप येत आहे.

Chinchwad Bye-Election : 1 लाख 86 हजार मतदारांना वाटल्या वोटर स्लिप

शिवसृष्टीचा पहिला टप्पा हा लोकार्पण सोहळ्यानंतर लगेचच शिवप्रेमींसाठी खुला होईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात भवानी माता स्मारक, राजसभा आणि डार्क राईड, रंगमंडल यांचा तर तिसऱ्या टप्प्यात माची, गंगासागर, बहुविध आकर्षण केंद्र, कोकण याचा समावेश आहे. प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात बाजारपेठ, प्रेक्षागृह, वाहनतळ व अश्वारोहण, लँडस्केप- हार्डस्केप आदी कामे पुढील दोन वर्षांच्या काळात पूर्ण होणार आहे.

लोकार्पणानंतर सरकारवाडा सामान्य नागरिक व शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार असून या ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन नोंदणीद्वारे तिकीट बुक करून या ठिकाणची शिवकालीन सफर अनुभवता येणार आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती रु. 350 (सर्व करांसहित) इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटन धोरण 2016अंतर्गत प्रकल्पाला मेगा टुरिझम प्रोजेक्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. (Pune News) या प्रकल्पामुळे 300 हून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि किमान 100 लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.