Vadgaon Maval News : गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज  – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु असून दहा दिवसातच गॅस शवदाहिनी प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

मावळ तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा ताण तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीवर पडत असून अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची गैरसोय असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2020-2021 नावीन्यपूर्ण योजनेतून गॅस शवदाहिनी प्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सादर केला होता.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी जिल्हा समितीकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार हा प्रकल्प उभारण्यासाठी 80 लाख 48 हजार रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महामार्गालगतच्या कान्हे व साते स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करत आहेत. लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने धुरामुळे  पर्यावरणाचे प्रदूषण होत आहे. मावळ तालुक्यातील मृतदेहावर सद्यातरी तळेगाव दाभाडे येथील गॅस शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी नंबर लावून प्रतीक्षा करावी लागत असल्याने नातेवाईकांची गैरसोय होत असून त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत गॅस शवदाहिनी काळाची गरज आहे. हि गरज ओळखून प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी पुढाकार घेवून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. केवळ दहा दिवसातच गॅस शवदाहिनी सुरु करणार असल्याचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.