Mumbai : युतीचे प्रामाणिकपणे काम करा, महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवायचा – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज – युती म्हटली की तडजोड आली. काही जागा तयारी करून सुटल्या. ज्यांना उमेदवारी मिळली नाही, त्यांची मी माफी मागतो. तुमची ताकद कमी होता कामा नये. शिवसेना-भाजप युतीचे प्रामाणिकपणे काम करा, असे सांगून महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवविण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेश पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात दिले.

पुण्यातील शिवसैनिकांना आता भाजपचे प्रामाणिकपणे काम करावे लागणार हे स्पष्ट झाले. 1 रुपयात आरोग्य चाचणी, 10 रुपयांत चांगल्या  अन्नाची थाळी आशा अनेक महत्वपूर्ण घोषणा उद्धव यांनी आपल्या भाषणात केल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर, कर्जमुक्ती करणार असल्याचे सांगत 7/12 कोरा करणार असल्याचे आश्वासनही यावेळी दिले. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाच्या युतीला तेथील जनतेने नाकारले. आपली युती राज्यात प्रामाणिकपणे स्वीकारली.

कोणत्याही परिस्थितीत सत्ता पाहिजेच, सत्तेत आहो आणि राहणारच असे सांगून युती मजबूत राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. अजित पवार यांचा डोळ्यात मगरीचे अश्रू आले होते. शेती करणार असल्याचे ते म्हणाले होते, पण धरणात पाणी नसेल तर काय करणार, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला. जेव्हा माझा शेतकरी तुमच्याकडे पाणी मागत होता, तेव्हा तुम्ही काय म्हणाला? शेतकऱ्यांची व्यथा ऐकून पाणी का नाही दिले? असे सांगत अजित पवार यांना टार्गेट केले. दरम्यान, अमित शाह जे बोलतात, ते करतात, अशी स्तूतीसुमनेही उद्धव यांनी उधळली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.