Talegaon: ठेकेदाराकडून मारहाणीच्या निषेधार्थ घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज – ठेकेदाराने कचरा संकलन करणाऱ्या दोन घंटागाडी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे तळेगाव नगरपरिषद हद्दीत दिवसभर कचऱ्याचे ढीग उपसण्याचे काम ठप्प झाले.

घंटागाडी कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे तसेच मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे लेखी तक्रार केली.
संबंधित ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनावर २६ घंटागाडी कामगारांच्या सह्या आहेत.

घंटागाडी कामगारांना मारहाणीचा हा प्रकार सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. मारहाण प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली म्हणून संबंधित ठेकेदाराच्या हस्तकांनी काही कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी वैभव आवारे व आरोग्य समितीचे सभापती अरुण भेगडे पाटील यांनी काम बंद आंदोलनाची दखल घेऊन कामगार व ठेकेदार यांच्यात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अरुण भेगडे यांनी कामगारांची समजूत काढल्यानंतर अखेर मंगळवारी संध्याकाळी कचरा संकलनाचे काम सुरू झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.