Chakan News : कंपनीतील यंत्रमानव अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करत असलेल्या एका कामगाराच्या अंगावर वेल्डिंग करत असलेला एक यंत्रमानव (रोबोट) पडला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना मेदनकरवाडी मधील टाटा ऑटोमोटीव्ह अँड असेंम्बलीस लिमिटेड या कंपनीत बुधवारी (दि. 24) सकाळी घडली.

उमेश रमेश ढाके (वय 44, रा. आळंदी, ता. खेड. मूळ रा. भुसावळ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी प्रिया उमेश ढाके (वय 43) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी ऍक्युपायर डायरेक्ट, कंपनीचे प्लांट मॅनेजर, प्रोडक्शन हेड युवराज बुचडे, असिस्टंट राहुल खैरनार, मेंटेनन्स मॅनेजर रवींद्र कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उमेश ढाके मेदनकरवाडी मधील टाटा ऑटोमोटीव्ह अँड असेंम्बलीस लिमिटेड या कंपनीत काम करत होते. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना हेल्मेट, हॅन्डग्लोज, गमबुट असे सुरक्षेचे साहित्य आरोपींनी दिले नाही. तसेच कंपनीत काम करणाऱ्या एका यंत्रमानवाचा (रोबोट) सेन्सर खराब असताना देखील त्याला बुधवारी सकाळी स्पॉट वेल्डिंग करण्यासाठी फिक्चरवर पाठवले.

त्यावेळी उमेश त्याच फिक्चरवर काम करत होते. यंत्रमानव नादुरुस्त असल्याने काम करताना सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास अचानक तो उमेश यंच्या अंगावर पडला. त्यात उमेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.