Alandi : पोल्ट्री फार्मवरील कामगाराला दोघांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – पोल्ट्री फार्मवर काम करणारा कामगार औषधे आणण्यासाठी दुचाकीवरुन जात असताना त्याला रस्त्यात अडवून दोघांनी मारहाण केली. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी (दि. 27) साडेबाराच्या सुमारास कोयाळी पुढे शेल पिंपळगाव येथे घडली.

दादासाहेब श्रीहरी कदम (वय 45, रा. वडगाव घेनंद, ता. खेड. मूळ रा. कारला, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब कदम हे सयाजी साळुंखे यांच्या पोल्ट्री फार्मवर काम करतात. कोंबड्यांच्या पिलाचे औषध आणण्यासाठी दादासाहेब शनिवारी दुपारी सयाजी यांच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / जी बी 6558) जात होते. ते कोयाळी पुढे शेल पिंपळगाव येथे आले असता, त्यांच्या मागून आलेल्या कार चालकाने दादासाहेब यांना रस्त्यात थांबवले. ‘कारला कट का मारला, आम्हाला साईड का दिली नाही’ असे म्हणत दादासाहेबांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये दादासाहेब यांच्या हाताच्या दंडावर व पायावर गंभीर दुखापत झाली. तसेच दादासाहेब यांचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम गहाळ झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.