Pune : कामगार पुतळा झोपडपट्टीतील प्रकल्पग्रस्तांचा मेट्रोला विरोध

एमपीसी न्यूज – कामगार पुतळा झोपडपट्टी मेट्रो बाधितांनी आपले जागेवरच पुनर्वसन करावे, अशी मागणी लावून धरली आहे. महामेट्रोकडून या ठिकाणी बाधित होणाऱ्या ८४ जणांची इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हा तिढा सुटताना दिसत नाही.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेत गुरुवारी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत बाधितां समवेत बैठक घेतली. या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. कामगार पुतळा झोपडपट्टीच्या ठिकाणी मेट्रोमार्गासाठी आवश्यक असणारी जागा देऊनही जागा शिल्लक राहत आहे. झोपडपट्टीधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन होणे शक्य आहे. मात्र, संपूर्ण झोपडपट्टीच हलविण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप बाधितांकडून करण्यात येत आहे.

कामगार पुतळा झोपडपट्टी ही अधिकृत झोपडपट्टी म्हणून घोषित करण्यात आली आहे. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्तावही मंजूर आहे. पण, गेल्या 12 वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेंगाळलेला आहे. मेट्रो प्रकल्पामुळे या ठिकाणी ८४ घरे बाधित होत आहेत. त्या बाधितांचे लोहगाव आणि भवानी पेठ परिसरात पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, येथील नागरिकांकडून ८४ जणांचे पुनर्वसन न करता मेट्रो प्रकल्प होऊन उरलेल्या जागेत सर्वांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. याला मेट्रोने मात्र असमर्थता दर्शवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.