Lonavala : नगरपरिषद कर्मचार्‍यांचे दिवसभर काम बंद आंदोलन

अतिक्रमण कारवाई दरम्यान शिवसेना पदाधिकार्‍य‍ांनी शिविगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने खंडाळा भागात सुरु असलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाळ व धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ आज नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसभर काम बंद आंदोलन करत संबंधितांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिले.

लोणावळा नगरपरिषदेकरिता उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीच्या आदेशाप्रमाणे शहरात नगरपरिषदेने 1 जून ते 5 जून दरम्यान अतिक्रमण कारवाई मोहीम हाती घेतली होती. कारवाईच्या दुसर्‍या दिवशी खंडाळ्यातील राजमाची सनसेट पाॅईंट येथे कारवाई सुरु असताना शिवसेना पदाधिकारी मोहन मल्ला याने कारवाईत हस्तक्षेप करत अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की केली, असा कर्मचार्‍यांचा आरोप आहे. तसेच यावेळी घटनास्थळी आलेल्या शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी व नगरसेविका सिंधू परदेशी यांनी देखील शिविगाळ केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधितांवर कारवाई करावी याकरिता कर्मचार्‍यांनी आज दिवसभर कामबंद आंदोलन करत अरेरावीचा निषेध नोंदविला.

दरम्यान, अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली मोठ्यांना व मर्जीतील लोकांना सूट देत केवळ गोरगरिबांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी व नगरसेविका सिंधू परदेशी यांनी प्रशासनावर केला आहे. चौधरी म्हणाल्या शहरात सर्वत्र खुलेआम अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे होत असताना त्याकडे जाणिवपूर्वक दुलर्क्ष करत प्रशासन गोरगरिबांच्या टपर्‍या व हातगाड्यांवर कारवाई करत आहे. अतिक्रमण कारवाईला आमचा विरोध नाही. मात्र, ती करत सरसकट केली जावी ही आमची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.