वाचूयात एक तरी पुस्तक…!

जागतिक पुस्तक दिन आणि कॉपी राईट डेच्या निमित्ताने संदीप गेजगे यांचा लेख....

प्रत्येक वर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन आणि कॉपी राईट दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. 23 एप्रिल या दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन आणि स्मृतिदिनही असतो. महान इंग्लिश नाटककार आणि लेखक विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ 23 एप्रिल ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

_MPC_DIR_MPU_II

साधारणपणे, जगभरात  हा दिवस वाचकांना वाचनासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या मनावर विविध लेखकांचा,साहित्यिकांचा आणि पुस्तकांची ओळख व वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा म्हणून पॅरिस येथे झालेल्या परिषदेत युनेस्कोने 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ (वर्ल्ड बुक डे)  व कॉपिराईट दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

जगामध्ये पहिल्यांदा पुस्तक दिवस हा 23 एप्रिल 1995 रोजी साजरा करण्यात आला. युनेस्को दरवर्षी जागतिक बुक कॅपिटल म्हणून एखाद्या देशातील शहराची निवड करतात . जागतिक बुक कॅपिटल अ‍ॅडव्हायझरी कमिटीच्या सूचनेनुसार युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अझोले (Audrey Azoulay) यांनी सन 2020 यावर्षाची जागतिक पुस्तक कॅपिटल म्हणून कौलालंपूर (मलेशिया) या शहराची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 2019 ला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून शारजाची (दुबई) निवड  केली होती आणि आपल्या भारत देशात 2003 साली नवी दिल्ली ला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड झाली होती.

पुस्तक वाचनाची आवड सर्वांना आपल्या शालेय जीवनापासूनच मिळाली आहे, परंतु आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्व काही आपल्याला संगणक, मोबाईल तसेच टॅब्लेटवर एका क्लिकद्वारे  हवी ती माहिती उपलब्ध होते. हातामध्ये पुस्तक घेऊन वाचन करण्यापेक्षा ऑनलाईन वाचन करणाऱ्याची संख्या जास्त आहे. वाचन केल्यामुळे माणसाच्या बुद्धीचा व व्यक्तीमत्वाचा विकास होतो. वाचन ही एक कला आहे.  वाचन केल्यामुळे आपणाला ज्ञान प्राप्ती होते.  योग्य वेळी योग्य पुस्तक मिळाले  तर आयुष्य बदलू शकते. पुस्तके वाचल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास मदत हिते . वाचनामुळे अनेक व्यक्तींचे जीवनाचे सोने होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा ग्रंथ हे जीव की प्राण होते हे आपणास माहित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  ‘बुद्ध चरित्र’ हे पुस्तक गुरुजींनी भेट म्हणून दिले होते. या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्यावर एवढा झाला की, ते  भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे पुस्तकांविषयीचे महत्व सांगताना म्हणतात “एक चांगले पुस्तक हे शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते”.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील जेष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू म्हणाले होते की, “जो वाचन करीत नाही, तो माणूसच नाही.” याचाच अर्थ असा की प्रत्येकाने वाचन साहित्याचा वापर केला पाहिजे. आपल्याकडे साहित्य संमेलनातून वेगवेगळ्या ग्रंथांचे ,लेखकांची माहिती तसेच वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने संमेलन भरविले जाते. अनेक समारंभामध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रमुख पाहुण्यांना लोकांकडून पुष्पगुच्छ तसेच फुले भेट देताना दिसून येतात आणि दुसऱ्या दिवशी ते पुष्पगुच्छ, फुले  फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो, त्याच्याऐवजी एखादे पुस्तक भेट दिले  तर ते समाजाच्या दृष्टीने उचित ठरू शकेल.

 चला, तर मग जागतिक पुस्तक  दिनानिमित्त प्रत्येकाने एखादेतरी पुस्तक वाचन करण्याचा संकल्प करूयात आणि या दिवसाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवूया.

लॉकडाऊनमुळे  कधी नव्हे ते इतका मोकळा वेळ सगळ्यांना मिळाला आहे, सुदैवाने अनेक चांगल्या कथा, कादंबरी, कविता संग्रह, आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन आवृत्त्या देखील  सहजगत्या उपलब्ध आहेत, अगदीच काही नव्हे तर शालेय अभ्यासक्रमांची पुस्तकेही वाचल्यास निश्चितच आनंद मिळेल. विशेष बाब म्हणजे ही  वाचनाची सवय अंगवळणी पडल्याने नकळतच व्यक्तिमत्व विकासाला आपोआपच  चालना मिळेल.

जागतिक कॉपी राईट डे

कॉपी राईट ही एक कायदेशीर संकल्पना असून, जगामधील प्रत्येक शासनाने ही आधिनियमित केलेली आहे. लेखक किंवा मूळ कार्यनिर्माते यांना विशेषतः मर्यादित काळासाठी विशेष कायदेशीर अधिकार दिले गेले आहेत. ज्यानुसार एखाद्या व्यक्तीने लेखन किंवा तयार केले जाणारे विशिष्ट काम त्याच्या परवानगीशिवाय वापरले जाऊ शकत नाही. जर आपण एखाद्या व्यक्तीचे कार्य दुसऱ्या कोणीही स्वतःचे म्हणून वापरल्यास आणि पकडले गेले तर त्या व्यक्तीवर कॉपी राईट कायद्याद्वारे गुन्हा दाखल करू शकता येतो.

लेखक :  संदीप गेजगे

(लेखक चिंचवड  येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस  या व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत.) मोबा  :7249658852

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.