World Corona Good News: जर्मनीत 90 टक्के रुग्णांनी केली कोरोनावर मात, स्पेन, इटली आणि फ्रान्समध्येही चांगली सुधारणा

World Corona Good News: 90% of patients in Germany overcome corona, Spain, Italy and France also improve

एमपीसी न्यूज – जर्मनीतील 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून काही दिवसांपूर्वी मृत्यू तांडव झालेल्या स्पेन, इटली, फ्रान्स या देशांनीही कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात चांगले यश मिळविल्याने त्या देशांमधील परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

जर्मनीमध्ये एकूण 1 लाख 83 हजार 765 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी तब्बल 1 लाख 65 हजार 900 रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. हे प्रमाण 90.3 टक्के आहे.

जर्मनीत आतापर्यंत एकूण 8 हजार 618 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 4.7 टक्के आहे. अन्य देशांच्या तुलनेत जर्मनीने कोरोनामुळे होणारी जीवितहानी बऱ्यापैकी मर्यादित ठेवण्यात यश मिळविल्याचे दिसून येत आहे. आता जर्मनीत 9 हजार 247 सक्रिय रुग्ण आहे. हे प्रमाण केवळ पाच टक्के आहे. त्यापैकी 677 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पेनमध्ये 69 टक्के रुग्ण बरे

काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या स्पेनमधील परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. त्यामुळे आता हा देश चौथ्या स्थानापर्यंत खाली आला आहे. स्पेनमध्ये एकूण 2 लाख 33 हजार 197 जणांना आतापर्यंत कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 1 लाख 96 हजार 958 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण 68.7 टक्के आहे.

स्पेनमध्ये आतापर्यंत एकूण 27 हजार 127 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 9.46 टक्के आहे. जागतिक सरासरीपेक्षा हे खूप जास्त आहे. कित्येक दिवस या देशात दररोज 500 ते 961 दरम्यान मृतांचा आकडा होता. गेल्या काही दिवसात तो एकदी 1-2 इतक्या नगण्य पातळीपर्यंत खाली आणण्यात स्पेन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. स्पेनमध्ये आता सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 21.8 टक्के उरले आहे, ही मोठी आशादायक बाब आहे.

इटलीमध्ये उरले फक्त 18 सक्रिय रुग्ण

सुरूवातीला चीननंतर सर्वाधिक कोरोना संसर्ग झालेला देश म्हणून इटलीकडे पाहिले जात होते. त्या काळात 15 पेक्षा अधिक दिवस इटलीतील मृतांचा आकडा 600 च्या वर होता. 27 मार्चला तर 919 इतकी विक्रमी मृत्यूंची नोंद झाली होती. इटलीतील मृत्यूदर 14 टक्क्यांच्याही पुढे आहे. जागतिक मृत्यूदराच्या सुमारे अडीचपट हे प्रमाण आहे. मृतांचे हे प्रमाण काल 60 पर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस हे प्रमाण सातत्याने कमी राहिल्याने इटलीला मोठा दिलासा मिळाला आहे.

इटलीत आतापर्यंत एकूण 2 लाख 33 हजार 197 कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी एक लाख 58 हजार 355 म्हणजे जवळजवळ 68 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता इटलीमध्ये 41 हजार 367 म्हणजे फक्त 18 टक्के सक्रिय रुग्ण उरले आहेत. त्यापैकी 424 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

फ्रान्समध्येही रोजच्या मृतांच्या संख्येत लक्षणीय घट

फ्रान्समध्ये कोरोनाचा मृत्यूदर हा 15 टक्के म्हणजेच जागतिक सरासरीच्या अडीचपट आहे. मात्र गेल्या काही दिवसांत फ्रान्समधील एका दिवसातील मृतांचा आकडा घसरून दोन आकडी झाला आहे. मागील दोन दिवसांत तर तो 31 पर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळत आहे. फ्रान्समध्ये 22 दिवस मृतांचा आकडा 500 पेक्षा अधिक राहिलेला आहे. त्यापैकी सहा दिवस तो एक हजारपेक्षा वर होता. 15 एप्रिलला फ्रान्समध्ये सर्वाधिक म्हणजे 1,438 कोरोना बळी गेले होते.

फ्रान्समध्ये एकूण 1 लाख 89 हजार 220 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी 68 हजार 440 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 36 टक्के आहे. फ्रान्समध्ये अजूनही 91 हजार 947 सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रमाण 49 टक्के आहे. मृतांची संख्या घटणे हा फ्रान्ससाठी सर्वात मोठा दिलासा म्हणावा लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.