World Corona Update: लठ्ठ व्यक्तींना कोरोना विषाणूपासून जास्त धोका, अमेरिकन संशोधनातील निष्कर्ष

World Corona Update: Obese people at higher risk from Corona virus, US research finds

एमपीसी न्यूज – लठ्ठ किंवा स्थूल शरीरयष्टी असलेल्या व्यक्तींसाठी कोरोना विषाणू अधिक घातक ठरू शकतो, असा निष्कर्ष एका अमेरिकन संशोधनात निघाला आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ व्यक्ती व लहान मुलांबरोबरच स्थूल व्यक्तींना कोरोनापासून दूर राहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

अमेरिकेतील एका संस्थेने सुमारे तीन हजार कोरोना रुग्णांचा केस स्टडी केला. त्यात सुमारे 37 टक्के रुग्ण स्थूलतेमुळे गंभीर आजारी असल्याचे दिसून आले आहे. स्थूल व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांची जोखीम वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा स्थूल व्यक्तींमध्ये कोरोनामुळे मृत्यूची भीती सुमारे 40 टक्क्यांनी जास्त असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून निघाला आहे.

आतापर्यंत 75 पेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच मधुमेह, रक्तदाब, दमा, श्वसनाचे विकार आदी जोखमीचे आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात आता लठ्ठपणा या आणखी एका जोखमीची भर पडली आहे.

भारतात स्थूल व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे सगळे घरी आहेत. घरात असल्यामुळे जिभेचे चोचले पुरविले जात आहेत. त्याच बरोबर बाहेर पडायचे नसल्यामुळे व्यायाम बंद आहे. त्यामुळे स्थूलतचे प्रमाण अधिक वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थूल व्यक्तींनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच व्यायामाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

स्थूल व्यक्तींमध्ये इतर जोखमीचे आजार असतील तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.