Pune News : जागतिक कन्या दिन; मुलींच्या प्रश्नांविषयी मुली बोलतात तेंव्हा…

एमपीसी न्यूज – मुलींच्या समस्या सोडविण्यासाठी – जागतिक कन्या दिवस हा मुलींच्या जगभरात हक्कांविषयी उहापोह करण्याच्या उद्देशाने जगभरात साजरा केला जातो. या वर्षाची जागतिक कन्या दिनाचे बोध वाक्य आहे ” My voice for our equal future” म्हणजेच ” माझा आवाज आपल्याला भविष्यात समान संधीसाठी.” या बोध वाक्याला साकार करण्यासाठी वर्क फॉर इक्वॅलिटी ही संस्था तळागाळातील मुलींचे संघटन करून त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहावे म्हणून प्रभावीपणे काम करत आहे.

जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने संस्थेने मुलींचे अधिवेशन आयोजित केले होते. त्यात संस्थेशी जोडल्या गेलेल्या अनेक मुलींनी आपले प्रश्न मांडले. त्या कशा जबाबदार नागरिक आहेत आणि कशा पद्धतीने समाज हिताच्या कामांमध्ये हिरीरीने सहभाग घेत आहेत या विषयी मुलींनी मांडणी केली. त्यातील काही ठळक प्रश्नांविषयी किशोरवयीन मुलींचे मनोगत –

मानसी – वय 16

शाळेतील मासिक पाळी व्यवस्थापनाच्या सुविधांचा अभाव – मुलींच्या शिक्षण गळतीचे महत्त्वाचे कारण

आपल्या समाजात आज सुद्धा मासिक पाळी या विषयावर खुलेपणाने बोलता येत नाही. हा विषय महिलांचा मुलींचा वैयक्तिक आणि उंबऱ्या आतला विषय असेच समजले जाते. त्यामुळे हीच मानसिकता शाळांमध्ये देखील आपल्याला दिसते. शाळेत मासिक पाळी व्यवस्थापन हा मुद्दा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अविभाज्य भाग असून सुद्धा तो बोलण्यासाठी विद्यार्थिनी आणि शिक्षक या दोघांमध्ये संकोच असल्यामुळे शाळेत मासिक पाळी व्यवस्थापनाच्या सुविधांच्या खूप अडचणीत तशाच दिसतात. शाळा डिजिटल होतात, भिंती बोलक्या होतात पण टॉयलेट्स आणि मासिक पाळी व्यवस्थापनाची अवस्था काही बदलत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतासारख्या रूढीवादी आणि परंपरावादी देशांमध्ये मासिक पाळीच्या काळात 60 टक्के मुले गैरहजर राहतात. मुलींच्या शाळा गळती, बालविवाह, बेरोजगारी आणि हिंसा यांचे हेच कारण ठरते.

प्रियंका – वय 14

गावपातळीवरील बाल सुरक्षा समिती सक्षम करा

मुलांचे सगळ्या प्रकारच्या शोषणापासून संरक्षण करण्यासाठी गाव, नगर पातळ्यांना जी बाल सुरक्षा समिती कायद्याने बंधनकारक आहे, त्या बाल सुरक्षा समितीचा आम्ही आमच्या तालुक्यातील पंधरा गावातील 179 प्रातिनिधिक स्वरूपातील मुलांशी चर्चा केली असता असे दिसते की, एकही मुलाला बाल सुरक्षा समिती विषयी माहिती नव्हती. तसेच त्यांच्या गावात बाल सुरक्षा समिती आहे की नाही व त्याचे कोण प्रतिनिधी आहेत, हे काहीच माहिती नव्हते.

मुलांवरील हिंसाचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत असताना शाळा, आश्रम शाळा, निवासी वसतिगृह या सर्व ठिकाणी असलेली मुले कोरोनाच्या काळात घरीच आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असताना देखील गाव पातळीला बाल सुरक्षा समिती विषयी कोणतेच गांभीर्य दिसत नाही. काही ठिकाणी तर असा देखील अनुभव आला की खुद्द सरपंचांनाच बाल सुरक्षा समिती म्हणजे काय हे माहीत नव्हते. ग्रामपंचायत पातळीला मात्र बाल सुरक्षा समिती आहेत असे सांगितले जात आहे. या जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रांजल वय 16

शाळांच्या वेळा बदलताना एसटीच्या वेळांचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे

कोरोनाच्या काळात मोठ्या मुलांचे शाळेतील तास सुरू झाले. पण त्या पद्धतीने एसटीची सोय नसल्यामुळे वाड्या वस्त्यांमधील आतल्या गावांमधील मुलांची शाळेत जायची आणि यायची खूपच गैरसोय होत आहे. याचा कोणी विचार केला नाही. खाजगी गाड्या बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलांना परवडत नाही. त्यामुळे इच्छा नसताना देखील शाळा बुडवावी लागते. त्यातही शिक्षणाची इच्छा असणाऱ्या माझ्यासारख्या मुली याचीही पर्वा न करता सरळ पाच-पाच किलोमीटर शाळेत चालत जातात. पण डोंगर-दर्‍यांमधून एकटे जाताना खूप भीती वाटते. त्यामुळे सुरक्षितता की शिक्षण असा मुद्दा मुलींच्या बाबतीत जेव्हा येतो तेव्हा मुलींना माघार घ्यावी लागते.

या सर्व प्रश्नांचा विचार करता खेड पंचायत समिती माजी सभापती अंकुश राक्षे यांनी गेल्या वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन हा मुद्दा लावून धरला होता. मात्र कोरोनाच्या काळात त्यावर फार काम करता आले नाही. त्यामुळे आता शाळा सुरू होत असल्यामुळे पुन्हा एकदा खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, सभापती अरुण चौधरी, गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्या पुढाकाराने खेड तालुक्यातील इयत्ता पाचवीच्या पुढच्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन, सॅनेटरी पॅड व्हेंडींग मशीन, डिस्पोजेबल मशीन, मुलींच्या संख्येनुसार टॉयलेट्स, मुबलक पाणी, हँडवॉश, सन्मान खोली आणि सफाई कामगार इत्यादी विषयांवर सर्व ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातील शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास या निधीमधून त्वरित काम करून कामाचा अहवाल 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत खेड पंचायत समितीला सादर करावा असा आदेश काढण्यात आला आहे.

कार्यक्रमाला खेड तालुक्यातील किशोरवयीन मुली, पालक उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेशी संलग्न गर्ल्स लीडर्सच्या प्रतिनिधींना उत्कृष्ट सामाजिक कार्यात सहभागी झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने व कमिन्स कंपनीच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले, अशी माहिती वर्क फाॅर इक्वॅलिटीच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.