World Theater Day Special : संगीत नाट्यसृष्टीतील अवलिया मास्टर दीनानाथ मंगेशकर 

 संगीत रंगभूमीच्या रोमांचक पर्वातला हृदयस्पर्शी अध्याय

एमपीसी न्यूज (डॉ. रवीन्द्र घांगुर्डे) : ‘संगीत नाट्यसृष्टितील `दीनानाथ मंगेशकर’ या अलौकिक व्यक्तिमत्वाला प्रत्यक्ष किती कक्षा होत्या हे अजूनही अज्ञात आहे. सागरातील हिमनग (आईसबर्ग) एक अष्टमांश दिसतो. सात अष्टमांश पाण्याखाली अदृश्य असतो. मा. दीनानाथांच्या बाबतीत असंच काहीसं म्हणावं लागेल.  वेड्या सुरांची वेड लावणारी दुनिया उभी करणारा हा अवलिया दुनियेला जेवढा कळला त्यापेक्षा कितीतरी पट तो कळलाच नाही. अज्ञातच राहिला.

‘गोमंतक’ सृष्टी सौंदर्याची विविधरंगी उधळण करणारा, निसर्गाचे वरदान लाभलेला भू प्रदेश. गोमंतकातील ‘श्री क्षेत्र मंगेश’, मंगेशीचा परिसर म्हणजे साक्षात नटेश्वराचा वनविहार. तिथल्याच एका मुलाची ही कहाणी. तेजस्वी डोळे, गौरवर्ण, तीव्र स्मरणशक्ती. ईश्वरदत्त  गोड गळा, नृत्य कौशल्य देखणेपण असलेला 13-14 वर्षांचा “बाल दीना “म्हणजेच शौर्य, माधुर्य, सौंदर्य आणि शुचिता या अभिजात गुणांची मुक्तहस्ताने खैरात केलेल्या गोमंतकाचा सुपुत्र मा. दीनानाथ गणेश मंगेशकर.

साहित्य, संगीत, कला, अभिनय, नेपथ्य, रूपसज्जा यांचं अदभूत विश्व असलेल्या मराठी संगीत रंगभूमीवर 1914 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पदार्पण केलेल्या बाल दीनानाथ यांनी 1942 मध्ये अकाली एक्झिट घेतली. पण जाताना आपल्या प्रिय नाट्य शारदेला सुंदर संगीताचे अलंकार दिले. या घटनेला शंभर वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याची झळाळी आजही नेत्रदीपक आहे. “दीनायन” अखिल संगीत जगतातला आणि संगीत रंगभूमीच्या रोमांचक पर्वातला हृदयस्पर्शी अध्याय. मा. दीनानाथ गणेश मंगेशकर या अवलिया कलावंताची ही कथा.

संगीताच्या दुनियेत आपल्या गायन प्रतिभेने ज्यांनी कलात्मक सुखद अपेक्षाभंगांचा धक्का ज्यांच्या गाण्याने दिला ते दीनानाथ !

संसारात शिणलेल्या जीवांना आपल्या नाद सौंदर्याने लुब्ध करून सर्व रसिक जीवांचा संसार ‘स्वरमय’ करून आनंदाचा केला,

स्वरबगीचा फुलवला ते दीनानाथ !

जगाला मोहून टाकणाऱ्या सिद्धकंठ प्रकाशित स्वराने लौकिक गायनाला परतत्त्वाचा स्पर्श करणारे दीनानाथ!

पारंपरिक संगीत शास्त्रात परंपरेच्या पुढे जाऊन संगीतातील भावसौंदर्य व स्वरसौंदर्य स्वयंप्रतिभेने मांडून कलेच्या प्रांतात नवीन क्षितीजे शोधणारे दीनानाथ ! नादब्रह्माची उपासना करताना शब्दब्रह्माची महती जाणून अक्षराच्या नाद सामर्थ्याची ओळख पटवून देणारे दीनानाथ !

गाण्यात उपजत निर्मितीक्षमता, मुक्तता आणि कल्पकता असणारे दीनानाथ!

श्रुतींसह स्वरांकडे पाहण्याची गरूडाची दृष्टी असणारे दीनानाथ !

देवदत्त प्रतिभेचे संगीततज्ञ, दैवी आवाज, व्यासंगी, मूलग्राही, चिकित्सक आणि स्वतंत्र धारणेचा विचार करणारे,

कलासक्त वृती, राष्ट्रभक्ती, वीरवृत्ती, स्वरलयीवर प्रभुत्व असणारे दीनानाथ !

तेज आणि माधुर्य अशा अनोख्या गुणांचे मिश्रण ज्यांच्या गाण्यात आहे ते दीनानाथ !

पंचमहाभूतांनी देह धारण करून साक्षात महादेव शिव म्हणजेच श्री मंगेश पृथ्वी तलावर अवतरले आणि संगीत विश्वाच्या महासागरात दीनानाथ रूपाने संपूर्ण सृष्टीला ‘गुरुतत्त्वाने’ आत्मानंदित केले. हे ‘गुरुतत्त्व’ म्हणजेच संगीतानंदाची चिरतरूण स्थिती. संगीतानंदाची ही स्थिती ज्यांनी जगताला दिली ते दीनानाथ !

परतत्वाचा स्पर्श लाभलेल्या आपल्या सिध्दकंठ प्रकाशित स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्रात एक नवे ‘मंगेशकरी युग’ सुरु करणारे मास्टर दीनानाथ गणेश मंगेशकर !

भारतीय संगीताचा विचार निखळ भारतीय दृष्टीने केला की पंचमहाभूते आणि तन्मात्रा या कल्पना सर्व दर्शनांना ग्राह्य आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंच महाभूते मूलतत्त्वासमान आहेत. सदगुरू दीनानाथांच्या गाण्याची अनुभूती घेताना त्यांचे गाणे आपल्याला या पाच तत्त्वात व्यापले आहे, असे दिसते आणि म्हणूनच आपण त्यांच्या गाण्याला अलौकिक, अद्भूत, अतर्क्य, अगाध, अपूर्व, अचित्य, अविस्मरणीय अशा नानाविध गुणविशेषणांनी संबोधतो. खरंतर हा मंगेशकरी सूर म्हणजे प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्यात घुणारा स्वयंभू नाद. तो सर्वत्र व्यापलेला आहे. आत्मिक आनंद देणारा आहे.

पार्थिव जग हे भौतिक म्हणजे पंचमहाभूतांनी उत्पन्न आहे. ही महाभूते एकत्र संयुक्त होतात आणि पार्थिव आविष्कार दाखवतात. पृथ्वी सृष्टी, हिरव्या रंगाची गर्द झाडी, डोंगराचे काळेभोर कडे, लालभडक मातीच्या मळलेल्या पाऊलवाटा, नदी खाड्यांचे नागमोडे व गडद निळे प्रवाह त्यात पांढरी शिडे डोलवित जाणारे पाडाव. या शांत प्रवाहात भोवतालच्या वनश्रीचे हलकेच दिसणारे प्रतिबिंब ! नारळी पोफळीची कुळागरे, केळीच्या बागा, रंगबिरंगी फुलांचे ताटवे, जिकडे पहावे तिकडे हिरवीगार, चैतन्यमय सृष्टी !  मा. दीनानाथांच्या गाण्यात या सृष्टी सौंदर्याच्या परिसीमा त्यांच्या स्वराविष्कारातून अनुभवायला मिळते.

मा. दीनानाथांचा स्वर म्हणजे नवरसांचा अथांग सागर, ऋतुमानानुसार या नवरसांचे दर्शन घडविण्यासाठी, नाट्य रंगविण्यासाठीच धरतीने या सागर किनाऱ्यांचे रंगमंच उभारले.  मा. दीनानाथांचे सूर कानावर पडले की, आपले पाय या स्वररूपी वाळूत रूततात आणि आपले यांत्रिक जीवन या किनाऱ्यावर संपते. त्यांच्या स्वरलाटांनी हा स्वररूपी सागर आपल्या जीवनात तरलता आणतोआणि आपण माणूस होतो. असा हा अतुल सौंदर्याचा  मा. दीनानाथांचा स्वर सागर किनारा.

 मा.दीनानाथांची तान ही वायू तत्वाची आहे. वारा जसा घोंगावतो, त्याचे आवर्त उभे राहतात त्याच तत्वाने जाणारी रसिकांना हवीहवीशी वाटणारी, मोहवणारी त्यांची तान. आकाश सर्वव्यापी आहे. आकाशाला संचार नाही. आकाशाची तन्मात्रा ध्वनी – शब्द हा अनाहत नाद. सुरेल भावपूर्ण स्वर हा मा. दीनानाथांच्या आवाजाचा प्राण. आकाशतत्वात त्यांचा संगीताविष्कार सर्वत्र व्यापून राहिला आहे. आकाश तत्वाची तन्मात्रा शब्द- ध्वनी म्हणजेच ‘ब्रह्मतत्व’ ! हे ब्रह्मतत्व दीनानाथी संगीतात व्यापून राहिले आहे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतानीयुक्त असे दीनानाथी संगीत म्हणजे परब्रह्म आहे.

प्रत्येक कलेला स्वतःचे अस्तिव आहे. संगीत हे स्वर्गीय आहे. स्वर्ग आणि धरेचे मिलन आहे. पंचमहाभूतातून उत्पन्न झालेल्या या पार्थिव जगात ही महाभूते एकत्र संयुक्त होतात आणि पार्थिव आविष्कार दाखवतात. त्यांचा स्वर हा ईश्वराचा स्वर आहे. संगीताचे गुह्य ज्ञान त्यांच्या जवळ होते.  मा. दीनानाथांचे गाणे विश्वाला मोहून टाकणारे आहे.  मा. दीनानाथांच्या संगीताची महती शब्दात सामावणारी नाही.  मी संगीत कलेचा छोटा साधक, सुरांचा उपासक. शिवमानस पूजेप्रमाणे मा. दीनानाथांच्या सुरांची आम्ही मनोभावे पूजा करत आहोत. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.