Pimpri : सायकलवरुन जगभ्रमंती; कोल्हापूरातील ध्येयवेड्या तरुणीचा ध्यास!

55 दिवसात कापले 14 हजार 432 मीटर अंतर

एमपीसी न्यूज – लहानपणी सर्वांनी सायकल चालवली असेल मात्र सायकलवरुन कोणीच जगभ्रमंती करण्याचे धाडस केले नसेल. कोल्हापूर येथील सायकलवेड्या 19 वर्षांच्या वेदांगीने ते धाडस करत अर्ध्या जगाची सायकलवरुन भ्रमंती पूर्ण केली आहे. केवळ 55 दिवसांमध्ये तीने 14 हजार 432 किलोमीटर अंतर कापले असून पुढील 50 ते 55 दिवसात 14 हजार किलोमीटर अंतर कापून ती एकून तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे.  

वेदांगी विवेक कुलकर्णी ही 19 वर्षाची मुलगी कोल्हापूरमधील आहे. सध्या ती इंग्लंड येथील बोर्नमथ विद्यापीठात स्पोर्ट्‌स मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी वेदांगीने सायकल चालवण्यास सुरुवात केली. वेदांगीने आपल्या जगभ्रमंतीला ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या शहरातून 17 जुलै  2018 पासून सुरुवात केली आहे. अॅडलेड 2800 किलोमीटर, मेलबर्न, सिडनी, ब्रिसबेन सहा हजार किलोमीटरचे अंतर कापून ती न्यूझीलंडला गेली. त्यानंतर वेलिंगटनचा 800 किलो मीटरचा प्रवास पूर्ण केला. 14 ऑगस्टला कॅनडामध्ये पोहचली. त्यानंतर ओटवा येथे गेली असून तिथे वेदांगीने 14 हजार किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे.

उद्या रविवारी (दि.16) उठावतून वेदांगी सायकलवरुन हॅलीफॅक्स याकडे रवाना होणार आहे. तेथून आर्यलंड, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, रशिया असा एकूण तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार, वेदांगी जगातील सर्वात जलद सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणारी सायकलस्वार ठरणार आहे. 29 हजार किलोमीटर अंतर वेदांगी केवळ 110 दिवसात पार करणार आहे. एवढा प्रवास करणारी वेदांगी भारतातील पहिली ठरणार असून जगातील तिसरी महिला ठरणार आहे.

याबाबत बोलताना तिचे वडील विवेक कुलकर्णी यांनी सांगितले की, वयाच्या 17 व्या वर्षी वेदांगीने सायकल चालवण्यास सुरुवात केली. दिवसाला 300 ते 350 किलोमीटर सायकल प्रवास एकटीने करत आहे. या यात्रेदरम्यान कॅनडा येथून प्रवास करणे सर्वात कठिण होते. अनेक घाट होते. त्यामुळे हे अंतर पार पाडण्यास अधिकचा वेळ लागला. अधिकचा लागलेला वेळ आणि अंतर कमी करण्यासाठी दुस-यादिवशी ती 350 पेक्षा जास्त किलोमीटर सायकल चालविते. 55 दिवसात तिने 14 हजार 432 किलोमीटर अंतर कापले आहे.  या प्रवासादरम्यान तिला अनेक अचडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, धैर्याने त्यावर वेदांगी मात करत आहे.

या उपक्रमातून तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लावा’ हा संदेश जगाला द्यायचा आहे. तसेच सायकल प्रवास हा पर्यावरणपूरक आहे, आदी संदेश द्यायचे आहेत. तसेच महिला जगात न घाबरता काहीही करु शकतात. त्यांना घाबरण्याचे कारण नाही. हा या अभियानामागील वेदांगीचा एक उद्देश आहे. 29 हजार किमीचा हा प्रवास ती कॅमे-यामध्ये कैद करणार असून भविष्यात लिव्हिंग एडव्हेंचर, शेअरिंग दी  एडव्हेंचर या नावाने ती लघुपट करणार आहे.

यापूर्वी तिने युरोप खंडातून सुमारे 20 हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. तसेच जुलै 2016 मध्ये वेदांगीने भारतातील सर्वात कठिण असलेला रस्ता यशस्वीरित्या पार केला होता. तिने मनालीतील अतिशय धोकादायक अशा मार्गाने सायकल चालवली होती. 29 हजार किमी प्रवासामध्ये अडचण येऊ नये म्हणून तीने सहा ते आठ तास सलग सायकल चालवण्याचा सराव केला होता.

या यात्रेसाठी क्रीडा भारती संस्थेचे सहकार्य लाभले आहे. तसेच विविध परवानग्या काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदत केली. त्याचबरोबर या उपक्रमास आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला असल्याचेही, वेदांगीचे वडील विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.