Junnar news: जागतिक पर्यटन दिन जुन्नरमध्ये साजरा

एमपीसी न्यूज – जागतिक पर्यटन दिनानिमित्त जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर आणि शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक, प्राचीन ,वस्तू, नाणी, प्रदर्शन व जुन्नर मधील पर्यटन संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी गोळेगाव येथील इतिहासाचे अभ्यासक व संग्राहक बापूजी ताम्हाणे यांचे अनुभव कथन तसेच जुन्नरच्या ऐतिहासिक संदर्भा विषयी मौलिक मार्गदर्शन झाले. यानिमित्ताने त्यांच्या संग्रहातील सातवाहन काळातील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते . त्यांचा अनुभव श्री छत्रपती महाविद्यालयातील जबाबदार पर्यटन चळवळीतील सहभागी सर्व स्वयंसेवक तसेच प्रमुख पाहुण्यांनी घेतला.
या कार्यक्रमाच्या औचित्याने जुन्नर मधील साहस पर्यटनातील संधी व आव्हाने या विषयीचे मार्गदर्शन साहस पर्यटनातील तज्ञ अभ्यासक जितेंद्र देशमुख यांनी केले. त्यांनी जुन्नर तालुक्यातील शक्य असणाऱ्या जमीन, पाणी व हवेतील पर्यटन संकल्पनांचे विस्तृत विवेचन केले. तसेच त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि कौशल्य याविषयी आग्रही भूमिका मांडली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री अमोल सातपुते यांनी जुन्नर वनविभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तसेच जुन्नर तालुक्यातील बहुसंख्य पर्यटन स्थळे ही वनखात्याच्या हद्दीत येत असून त्या पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जुन्नरच्या जबाबदार पर्यटन चळवळीत पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेविषयी जागरूकता व कृतिशील कामाविषयी वनविभाग आग्रही राहील असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर , जुन्नर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक तथा राज्याचे पर्यटन प्रशिक्षक मनोज हडवळे , संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, शिवछत्रपती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हणे, विश्वस्त जयवंत डोके, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे उपाध्यक्ष राधाकृष्ण गायकवाड, सचिव जितेंद्र बिडवई, खजिनदार शिरीष भोर, शिरीष डुंबरे , प्राध्यापक शरद मनसुख, गणेश मेहेर, सत्यवान खंडागळे, संतोष रोकडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापिका वैशाली सावंत यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एम. बी. वाघमारे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.