World Update: दिलासादायक! जगातील 13 लाख जणांनी केली कोरोनावर मात, कोरोनामुक्तांचे प्रमाण 34 टक्क्यांवर!

जर्मनीत 82 टक्के तर इराणमध्ये 80 टक्के तर स्पेनमध्ये 62 टक्के रुग्ण बरे होऊन गेले घरी

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – जागातील एकूण 38 लाख 22 हजार 951 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 2 लाख 65 हजार 084 रुग्णांचा (6.94 टक्के) मृत्यू झाला असला तरी तब्बल 13 लाख 02 हजार 995 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुक्तांची ही टक्केवारी 34 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जर्मनीत हे प्रमाण तब्बल 82 टक्के, इराणमध्ये 80 टक्के तर स्पेनमध्ये 62 टक्के आहे. कोविड -19 विषाणूवर कोणतेही प्रमाणित औषध अथवा उपचारपद्धती उपलब्ध नसतानाही कोरोनामुक्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही फार मोठी दिलासादायक बाब आहे. 

अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण असले तरी अमेरिकेतील कोरानावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र 16.86 टक्के इतके मर्यादित आहे. त्यामुळे अमेरिकेत सक्रिय रुग्णांचे प्रमाणही सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेतील कोरोनाचा मृत्यूदर 5.92 टक्के आहे. अमेरिकेतील मृत्यूदर हा जागतिक मृत्यूदरापेक्षा एक टक्क्याने कमी आहे, हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे 14.96 टक्के म्हणजेच जवळपास 15 टक्के इतका आहे. हा जगातील सर्वाधिक कोरोना मृत्यूदर असलेला देश आहे. या देशातील कोरोनामुक्तांची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही. चीनमध्ये तब्बल 94 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे, मात्र चीन कोरोनाबाधितांची व मृतांची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे. त्यामुळे चीनच्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा आक्षेप घेतला गेला आहे.

इराणमध्ये 80.26 टक्के कोरोनाबाधितांनी कोरोना विषाणूवर विजय मिळविला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुक्तांचे प्रमाण 62.81 टक्के आहे. टर्कीमध्ये 59.36 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. इटलीमध्ये कोरोनाचा मृत्यूदर 13.84 टक्के असला तरी कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणही 43.48 टक्के आहे. फ्रान्समध्ये मृत्यूदर 14.82 टक्के असून 30.98 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कॅनडामध्ये कोरोनामुक्तांचे प्रमाण 44.37 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ब्राझीलमध्ये 40.57 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रशियामध्ये कोरोनामुक्तांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 12.85 टक्के आहे, मात्र रशियात मृत्यूदरही 0.93 टक्के इतका कमी आहे.

भारतात आतापर्यंत जवळपास 29 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतातील कोरोना मृतांची टक्केवारी 3.37 इतकी कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे. जागतिक मृत्यूदराच्या निम्म्याहून कमी आहे. या दोन्ही बाबी आशादायक आहेत.

प्रमुख कोरोनाबाधित देशांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर यावर एक नजर टाकूयात

  1. अमेरिका – कोरोनामुक्त  16.86 टक्के,  मृत्यूदर 5.92 टक्के
  2. स्पेन – कोरोनामुक्त 62.81 टक्के,  मृत्यूदर 10.19 टक्के
  3. इटली – कोरोनामुक्त  43.48 टक्के,  मृत्यूदर 13.84 टक्के
  4. यू. के. – कोरोनामुक्त   (उपलब्ध नाही) टक्के,  मृत्यूदर 14.96 टक्के
  5. फ्रान्स – कोरोनामुक्त 30.98 टक्के,  मृत्यूदर 14.82 टक्के
  6. जर्मनी – कोरोनामुक्त  81.88 टक्के,  मृत्यूदर 4.33 टक्के
  7. रशिया – कोरोनामुक्त 12.85 टक्के,  मृत्यूदर 0.93 टक्के
  8. टर्की – कोरोनामुक्त 59.36 टक्के,  मृत्यूदर 2.72 टक्के
  9. ब्राझील – कोरोनामुक्त 40.57 टक्के,  मृत्यूदर 6.78 टक्के
  10. इराण – कोरोनामुक्त 80.26 टक्के,  मृत्यूदर 6.31 टक्के
  11. चीन – कोरोनामुक्त 94.00 टक्के,  मृत्यूदर 5.59 टक्के
  12. कॅनडा – कोरोनामुक्त 44.37 टक्के,  मृत्यूदर 6.66 टक्के
  13. पेरू –  कोरोनामुक्त 33.08 टक्के,  मृत्यूदर 2.80 टक्के
  14. भारत – कोरोनामुक्त 28.93 टक्के,  मृत्यूदर  3.37 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.