World Update: कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 52 हजार 632, उपचारानंतर 1 लाख 28 हजार 706 जण बरे!

जगभरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 25 हजार 44

एमपीसी न्यूज – जगभरात आजपर्यंत एकूण पाच लाख 52 हजार 632 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी 23.29 टक्के म्हणजेच एक लाख 28 हजार 706 रुग्ण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर एकूण 25 हजार 44 म्हणजेच कोरोना झालेल्यांपैकी 4.5 टक्के रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

मृत आणि कोरोनामुक्त झालेल्यांची मिळून एक लाख 53 हजार 750 जण वगळले तर आता जगात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 98 हजार 882 इतकी आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 3 लाख 77 हजार 820 जणांची म्हणजेच 95 टक्के रुग्णांची प्रकृती सुधारत असून पाच टक्के म्हणजे 21 हजार 62 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित

अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वांत जास्त म्हणजे 85 हजार 762 आहे. तिथे 1,868 रुग्ण उपचारांनी बरे झाले असून आतापर्यंत एकूण 1,306 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये 74 हजार 588 रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाचा पहिला उद्रेक चीनमध्ये झाला होता. चीनमध्ये एकूण 81 हजार 340 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी 74 हजार 588 रुग्ण बरे झाले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 3,292 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अजून 3,460 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून त्यापैकी 1,034 जणांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

इटलीत सर्वाधिक म्हणजे 8,215 मृत्यू

आतापर्यंत इटलीत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 8,215 बळी गेले आहेत. इटलीत एकूण 80 हजार 589 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 10 हजार 361 जण बरे झाले. अजूनही 62 हजार 13 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून 3 हजार 612 जणांची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक आहे.

स्पेनमध्ये कोरोनाचा उद्रेक

इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक पहायला मिळत आहे. स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 493 नवीन बळी गेल्याने मृतांचा आकडा 4,858 झाला आहे. एका दिवसात कोरोनाबाधित नवे 6,273 रुग्ण सापडल्याने स्पेनमधील कोरोनाबाधितांचा आकडा 64,059 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 4,165 जणांची प्रकृती अजून गंभीर किंवा चिंताजनक आहे.

ब्रिटनचे प्रिन्स व पंतप्रधानांनाही कोरोनाची बाधा

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्या पाठोपाठ पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 11,658 झाली असून मृतांचा आकडा 578 झाला आहे. आतापर्यंत 136 जण बरे झाले असून 10,945 सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यापैकी 163 रुग्णांची तब्येत गंभीर अथवा चिंताजनक आहे.

जर्मनीत कोरोनाबाधितांची मोठी संख्या

जर्मनीमध्ये 47,373 कोरोनाबाधित आढळले त्यापैकी 3,435 एका दिवसातील नवीन रुग्ण आहेत. जर्मनीतील मृतांचा आकडा 285 असून 23 रुग्णांची तब्येत गंभीर किंवा चिंताजनक आहे. कोरोनाबाधित प्रमुख देशांमधील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचा आकडा दिला आहे. इराण 32,332 (2,378), फ्रान्स 29,155 (1,696), स्वित्झर्लंड 12,311 (207), दक्षिण कोरिया 9,332 (139), नेदरलँड 8,602 (546), ऑस्ट्रिया 7,393 (58), बेल्जियम 7,284 (289).

भारतात 863 कोरोना पॉझिटीव्ह तर 20 जणांचा मृत्यू

वरील देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांची व मृतांची संख्या कमी दिसत असली तर भारतीयांना इतर देशांकडून धडा शिकणे गरजेचे आहे. वेळीच सावध होऊन स्वतःची व देशबांधवांची काळजी घेतली पाहिजे. भारतात एका दिवसात 136 नवीन कोरोनाबाधित सापडल्याने रुग्णांची संख्या 863 झाली आहे. आतापर्यंत एकूण 73 रुग्ण उपचारांमुळे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 20 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. भारतात अजूनही 770 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.