World Update: सर्वांत मोठी बातमी! बापरे….. कोरोना बळींनी ओलांडला एक लाखांचा टप्पा!

एमपीसी न्यूज – कोरोना (कोविड 19) या जागतिक महामारीतील बळींच्या संख्येने आज भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेनऊच्या सुमारास एक लाखांचा टप्पा पार केला. जगातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 38 हजार 326 झाली आहे. आतापर्यंत 1 लाख 273 कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. साथीच्या रोगात एवढा मोठा मानवी संहार प्रथमच झाला आहे. अजूनही कोरोनावर प्रभावी औषध तसेच प्रभावी प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे.

कोविड-19 चा पहिला रुग्ण एक डिसेंबर 2019 ला चीनमधील वुहान शहरात आढळला. जानेवारीत या विषाणूने बळी घेण्यास सुरूवात केली. जानेवारी अखेर या विषाणूची बाधा झालेल्या 259 जणांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी अखेरीस ही संख्या दोन हजार 977 पर्यंत पोहचली. मार्च अखेरीस हीच संख्या लक्षणीय वाढून 42 हजार 313 पर्यंत पोहचली. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत बळींच्या आकड्याने एक लाखाचा टप्पा ओलांडल्याने समस्त मानवजातीच्या छातीत धडकी भरली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत असून सर्वाधिक बळी इटली या देशात गेले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 18 हजार 849 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही सध्या मृत्यूचे तांडव चालू आहे. अमेरिकेतील कोरोना बळींची संख्या 17 हजार 927 झाली आहे. स्पेनमध्ये 15 हजार 970 बळी, फ्रान्समध्ये 12 हजार 210 बळी तर ब्रिटनमध्ये 8 हजार 958 बळींची नोंद झाली आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण पहिल्यांदा झाली व मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. त्या चीनमध्ये नंतर मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. चीनमध्ये आतापर्यंत 3 हजार 336 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

भारतात अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत 206 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान 21 व्या क्रमांकाचे आहे. भारतात योग्य वेळी कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनसारख्या कडक उपाययोजना केल्यामुळे मोठे नुकसान टाळण्यात यश आल्याचे दिसून येते. तरी देखील जगातील परिस्थिती गंभीर असल्याने भारतीयांनी सावध राहण्याची नीतांत गरज आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. कोरोना हा झपाट्याने पसरणारा संसर्गजन्य आजार असून अजून त्यावर औषध उपलब्ध नसल्याने प्रत्येकानेच सोशल डिस्टन्सिंग पाळून विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.