Talegaon Dabhade : ऐतिहासिक जलशयांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर!

जागतिक जलदिनानिमित्त जलाशय संवर्धनाचा संकल्प करण्याची गरज

एमपीसी न्यूज (प्रभाकर तुमकर) : नामनिर्देशनानुसार तळेगाव दाभाडेची ओळख परिसरातील तळ्यांच्या अस्तित्वामुळे आणि या तळ्यांचा नैसर्गिक बाज सुरक्षित ठेऊन प्रजा आणि प्राणीमात्रांना भरपूर पाणीसाठा उपलब्ध करून देणाऱ्या श्रीमंत सरदार सरसेनापती दाभाडे सरकार यांच्या योगदानामुळे! परंतु आता येथील जलशयांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे शासन “पाणी आडवा, पाणी जिरवा,”  शेततळी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांच्या बाबतीत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना हाती असलेल्या आणि शतकांहून अधिक काळ ऊन, वारा, पाऊस आणि दुष्काळाच्या कसोट्यावर स्वतःची उपयुक्तता सिध्द केलेल्या या तळ्यांना आणि जलाशयांना जीवनदान देण्याची गरज आहे. जागतिक जलदिनानिमित्त हा जीवनदान संकल्प करण्याची गरज आहे.

गेल्या 50 वर्षात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सर्वपक्षीय सत्ताधारी मंडळी आणि प्रशासनाने या नैसर्गिक जलाशयांच्या विकासाकडे निरपेक्षपणे कधीच लक्ष दिले नाही. अनेक वर्षे या ऐतिहासिक जलशयांना डबक्यांचे जीवन जगावे लागत होते. आणि नागरीकरणाच्या रेट्यात त्यांचे क्रियाकर्म करण्याकडे वाटचाल सुरू आहे. 250 कोटींचे बजेट असलेल्या नगरपरिषदेच्या धुरंधरांनी तळ्यावर किती खर्च केले यापेक्षा खर्चाच्या रकमेतून तळ्यात किती पाणी साठले आणि किती पैसा कुठे कुठे मुरला, याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यासाठी आता एनजीओ आणि सामाजिक संस्थानी लढा उभारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. तळेगावच्या वैभवात नैसर्गिक जलसंपत्ती  लाभलेली दोन तळी काळाच्या ओघात लयास गेलेली दिसत आहे. पाणी म्हणजे जीवन, पाणी नसेल तर जीवन नसेल….. हे सत्य आहे की, कोणताही जीव पाण्याविना राहू शकत नाही. सजीवांना जीवंत राहायचे असेल, तर पाणी हवेच….. मात्र हया तळेगाव दाभाडे येथील या दोन्ही तळयांची वाट लागली आहे.

राष्ट्रीय जलदिन साजरा करीत असताना पाणी, पर्यावरण चक्र सुरळीत राहावे. त्यांचे जतन व्हायला पाहिजे. त्याचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे.

पाणी, जंगल, जमीन या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. त्यावरच संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून असल्यामुळे त्या संपत्तीचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्य मनुष्याने करणे गरजेचे आहे. मात्र आपण आपल्या स्वार्थासाठी असमतोल निर्माण होईल इतकी वाईट दशा केली. हा समतोल बिघडला. तो राखता आला नाही.  येथील जीवसृष्टी नष्ट झाली.

पूर्वी पक्षी यायचे, वनसंपदा, प्राणीसंपदा मोठ्या प्रमाणात होती. मात्र दोन तळयांची अवस्था ओसाड दिसू लागली आहे. नगरपरिषदेने कोट्यावधी रूपये नाही त्याठिकाणी खर्च केलेत.

पाणी राष्ट्रीय संपत्ती हे कधी उमजणार?

तळेगाव हे नाव असलेली राज्यात अनेक गावे आहेत. तळेगाव हे नाव अर्थातच त्यात्या परिसरात असलेल्या पाण्याने भरगच्च असलेल्या तळ्यांमुळे पडले. पण काळाच्या ओघात नळ पाणी पुरवठा योजना गावोगावी आल्या आणि या तळ्यांच्या नाशिबी नटसम्राटाच्या प्रमाणे उपेक्षितता होत गेली. याच मालिकेत ऐतिहासिक तळेगाव दाभाडे येथील दोन्ही तळ्यांना असलेला अभाळमायेचा आधार हिसकावून घेतल्याने अखेरचा घटका मोजत आहेत. ईगल कंपनी जवळील ऐतिहासिक तळे, दाभाडे सरकारांनी बांधलेले, एकेकाळी सैन्य, गावातील माणसेच नाही तर घोडे, प्राणी, दुधदुभत्याची, पशु पक्ष्यांची, प्राण्यांची तहान भागावणारे हा जलाशय आज नष्ट केला जातो आहे.

तळे विकासाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, मात्र नगरपरिषदेचे प्रशासन त्या गोष्टींकडे डोळे बंद करून राहीले. तळ्यातील गाळ काढणे, सपाटीकरण करणे, तलावाची किनारभिंत बांधणे, वृक्षारोपण आणि संवर्धन करणे अशा कोणत्याही कामांची निविदा देखील प्रसिद्ध केलेली नसताना सत्ताधाऱ्यानी त्यांचे हितसंबंध ज़ोपासण्यासाठी त्यांच्या मर्जीतील लोकांना तळयाची कामे दिली.

त्यापोटी डिझेलचे बील, त्यातील माती, डबर, खोदाईसाठी कोटी रूपयांची बिले कशी अदा करण्यात आली, असा सवाल देखील मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला होता. या भ्रष्टाचारात काही अधिकारी, कंत्राटदार आणि त्यांचे हितसंबंधी नगरसेवक, तत्कालीन लोकप्रतिनिधी यांची याप्रकरणी सखोल चौकशी करावी व भ्रष्टाचार केलेली रक्कम  संबंधितांकडून व्याजासह वसूल करावी, अशी लेखी मागणी दाभाडे सरकार यांनी त्यावेळी केली होती.

गौण खनिजाच्या हव्यासापोटी पाण्याची वाहून गेलेली संपत्ती, पक्षी, जलचर आणि वनस्पतींचा नष्ट झालेला अधिवास, करोडोचा खर्च करून काहींचे भरलेले खिसे, पाणीदार भ्रष्टाचार आणि त्याच्या चौकशीचा दुष्काळी फार्स करणाऱ्यांवर जनरेट्याचा बांध आणि उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची मात्रा दिल्याशिवाय ही तळी पुन्हा पाणीदार होणार नाहीत।

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.