World Wildlife Week : ‘लंम्पी’ रोगाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे : चंद्रकांत शेटे

एमपीसी न्युज – वन्य प्राण्यांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने वनविभागाचे कार्य आव्हानात्मक आहे, तसेच ते गौरवास्पदही आहे. ‘लंम्पी’ रोगाचा प्रादुर्भाव इतर प्राण्यांना होऊ नये, यासाठी शासन लसीकरणावर भर देत आहे, ही जमेची बाजू आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, महाविद्यालय, महाराष्ट्र शासनाचा वनविभाग, तसेच वनपरिक्षेत्र वडगाव मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक वन्यजीव सप्ताह उपक्रमा’च्या (World Wildlife Week) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविभाग वडगाव मावळ परिक्षेत्राचे वनअधिकारी हनुमंत जाधव, एच.ए.खटके, एम. बी. दाते, डी.बी.ठोंबरे, टी.ए.ढेंबरे, जिगर सोळंकी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष गणेश मिसाळ, बीबीए बीसीए विभागाच्या प्रमुख प्रा. विद्या भेगडे, इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रमोद बोराडे, वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविकात सांगितले, की वन्यजीवांना माणसांपासून अनेक प्रकारचे धोके आहेत. प्राण्यांची आयात आपण आपल्या स्वार्थासाठी करत आहोत. आज जवळपास 85 जातींचे पक्षी नामशेष झाले आहेत. हनुमंत जाधव यांनी गिधाडे, बिबट्या, गवा, घुबड आदी मावळातील प्राण्यांची ओळख करून दिली. प्राण्यांची अन्नसाखळी विस्कळीत झाल्याने ते जंगलाबाहेर येतात. वडगाव मावळमध्ये निलेश गराडे यांची ‘वन्यजीव रक्षण मावळ संस्था’ शासनास सहकार्य करत असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली.
गणेश मिसाळ म्हणाले, वन्यजीव रक्षण संरक्षणाची (World Wildlife Week) भूमिका मावळ तालुक्यात उत्कृष्टपणे निभावत आहे. एम. खटके यांनी वन्यजीव अधिनियमन 1972 नुसार कायद्यातील तरतुदीनुसार प्राण्यांना अभय दिले गेल्याची माहिती दिली. जिगर सोळंकी यांनी मावळ तालुक्यातील प्राण्यांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना सहभागी संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी, तर प्रा. रोहित नागलगाव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.