Pimpri : शहरात ठिकठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त शहरात आज (रविवारी) ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध व्याख्यान, मेळावे, मार्गदर्शन शिबीर, आरोग्य शिबिर व सत्कार संमारंभ आयोजित करण्यात आले होते.

अस्तित्व फौंडेशन यांच्यातर्फे आकुर्डी येथील महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहाला भेट देऊन तेथील गरोदर महिला व नवजात शिशूंच्या आरोग्य, पोषणासाठी शतावरी, बेबी किट आणि फळे वाटून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रसूतिगृहात काम करणाऱ्या सर्व स्टाफचा देखील पुष्पगुछ व चॉकलेट देऊन सन्मान केला गेला.

“लोकमान्य लोकशाहीरा घ्या शाहिरी मुजरा” या कुसुमवत्सल्य फाऊंडेशन आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महिला शाहिरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सविता वाडेकर,श्रद्धा जाधव, रोहिणी नुला, आदिती कालेकर, तृप्ती उफाळे, अक्षदा इनामदार, अनुजा जोशी, पूजा माळी, रिद्धी कोंडे, निर्झरा उगले, सानवी कुटे या महिला शाहिरांचा सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालय तसेच संशोधन केंद्र व पुणे स्त्रीरोग प्रसूती शास्त्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची  तपासणी, स्तनांच्या कर्करोगाची तपासणी, मुख कर्करोग तपासणी, हाडांची ठिसूळता तपासणी तसेच विशेष कर्करोग व स्त्रीरोग आणि दंत व मुखरोग तज्ज्ञांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयामध्ये महिला दिनानिमित्त  खाद्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. खाद्य मेळाव्यातून जमा झालेल्या पैशातून वंचित घटकातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त सुरेल संगीताचा कार्यक्रम झाला यामध्ये पल्लवी ठाकरे यांनी गायन तर शोक मांडवे यांनी तबला वादन केले. निवृत्ती धाबेकर व दिगंबर राणे यांनी हार्मोनियम व ताळ वादन केले.

स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने कचरावेचक महिलांचा साडी तसेच हळदी-कुंकू लावून सन्मान करण्यात आला. शहर परिसरातील कचरावेचक महिला आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात, तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी अनेकदा स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता इतरांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या कामातून पार पाडत असताना दिसून येतात. अशा 8 महिलांचा स्वायत्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कात्रज येथे रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेशचे नेते संजय भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला . यावेळी रुग्णालय , महिला वसतिगृह , प्रकाशन क्षेत्र , घरकाम , कंपनी कर्मचारी , तसेच , घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला .

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालय सभागृहात सोनद सेवा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने चार्टर्ड अकौंटंटच्या होणार्‍या युवकांना प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने सीए व लेखिका क्षितीजा कांकरिया-जैन हिने 35 सीए झालेल्या महिलांना संपर्क करून त्यांना सीए करताना त्यांना किती अडचणी आल्या त्यांच्या शब्दात आलेल्या शब्दरुपी संग्रहाचा एकत्रित पुस्तिकेचे प्रकाशन आज जागतिक महिला  दिनानिमित्त संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.