India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी भारतात जगातील उच्चांकी कोरोना रुग्णवाढ 

गेल्या 24 तासांत वाढले तब्बल 3 लाख 32 हजार 730 नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णवाढ एकदिवसीय रुग्णवाढीचे जागतिक रेकॉर्ड तोडत आहे. गुरुवारी देशात तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, आजदेखील (शुक्रवारी) मागील 24 तासांत देशभरात तब्बल 3 लाख 32 हजार 730 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ही आजवरची जगातील सर्वात मोठी एकदिवसीय रुग्ण वाढ आहे.  

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 62 लाख 66 हजार 695 एवढी झाली आहे. त्यांपैकी 1 कोटी 36 लाख 48 हजार 159 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 93 हजार 279 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 24 लाख 28 हजार 616 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 2 हजार 263 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 86 हजार 920 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.14 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 83.91 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 27 कोटी 44 लाख 45 हजार 653 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 17 लाख 40 हजार 550 चाचण्या गुरुवारी (दि.22) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 13 कोटी 54 लाख 78 हजार 420 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.