BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा  (Sports Medicine) विभागाच्या वतीने क्रीडा चिकित्सा विषयक एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  2017- 18 चा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कॉमनवेल्थ गेम 2017 चा सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष पंढरीनाथ काळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्नल डॉ. दीप शर्मा, प्राध्यापिका डॉ. करुणा दत्ता, आदी उपस्थित होते.

कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांनी खडतर परिस्थितीतीवर मात करून कुस्तीला नवेस्थान निर्माण करून दिले. त्याच्या  यशस्वी कारकीर्दीचा आढावा डॉ. डी. एस. भामरे विभाग प्रमुख क्रीडा चिकित्सा यांनी दिला. खेळाडूच्या आरोग्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभागामध्ये क्रीडा चिकित्सा बाह्यरुग्ण विभाग नुकताच सुरू करण्यात आला आहे. याचा फायदा खेळाडूना नक्कीच होईल.खेळाडूनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी केले.

” कुस्तीपटू उत्कर्ष काळे ने कुस्तीत केलेल्या यशस्वी कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो.  आपले नाव जागतिक पातळीवर झळकत रोहो” असे अधिष्ठाता डॉ. भवाळकर यांनी आपल्या मनोगतात म्हंटले. हा कार्यक्रम कुलपती डॉ. पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

क्रीडा चिकित्साविषयक परिसंवाद कार्यक्रमामध्ये खेळाडूचा आहार, व्यायाम, दिनचर्या, भौतिकोपचार, विविध व्याधी, दुखापती, विविध तपासण्या, योग्य उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, परीक्षण, क्रीडा सराव आदी घटकांच्या माध्यमातून खेळाडूच्या आरोग्यासाठी आवश्यकते मार्गदर्शन व उपचार का गरजेचे आहेत आणि ते कोणकोणते या प्रमुख उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले यामध्ये क्रीडा चिकित्साशास्त्रची व्याप्ती विषयी डॉ. डी. एस. भामरे, भोतिकोपचार पद्धती डॉ बासू, खेळाडूचा ताणतणाव व तणावमुक्ती डॉ. आलोख देवधर, आहार मार्गदर्शन डॉ. सुयश भंडारी, स्पोर्ट्स फिजियोलॉजी कर्नल डॉ. दीप शर्मा, स्पोर्ट्स ऍन्थ्रोपोमेट्री आणि बायोमेकॅनिक्स विषयक डॉ. उर्वशी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी डॉक्टर्स, आहार तज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, सर्जन व भावी डॉक्टर्स विद्यार्थी असे एकूण 155  सहभागी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3