Nigdi : सोनोग्राफीचा चुकीचा रिपोर्ट दिल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी केली जाते. यामध्ये पालकांना केवळ डॉक्टरांवर विश्वास ठेवून डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे उपचार करतात. पण डॉक्टरांना माहिती असूनही त्याने जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, तर यामुळे संपूर्ण वैद्यकशास्त्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. असाच एक प्रकार चिखली येथे घडला आहे. सोनोग्राफी करणा-या डॉक्टरांना बाळ अपंग असल्याचे माहिती असूनही चुकीचा रिपोर्ट डॉक्टरांना दिला. डॉक्टरांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. मात्र, अपंग बाळाने जन्म घेतल्याने बाळाच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली.

स्वप्निल भाऊसाहेब घोडके (वय 29, रा.पाटिलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिखली येथील अश्‍वमेध नर्सिंग होमचे डॉक्‍टर प्रदीप पंडीत गिरिगोसावी, डॉ. दीपाली प्रदीप गिरिगोसावी, आशीर्वाद डाग्नोस्टिक सेंटरचे डॉ. हर्षद आदिक व डॉ. आशिष अडसुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल यांच्या पत्नी सिमा घोडके यांची चिंचवड येथील आशीर्वाद डाग्नोसिस्ट सेंटर येथे सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी हलगर्जीपणातून बाळ अपंग असताना देखील डॉ. हर्षद व डॉ. आशिष यांनी त्याबद्‌द्‌ल घोडके दाम्पत्याला कोणतीच माहिती दिली नाही. उलट बाळ तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले. याप्रकरणी डॉ. गिरीसावी यांनीही कोणतीच शहानिशा न करता सोनोग्राफी रिपोर्टवरुन बाळ ठीक असल्याचे सांगून पुढील उपचार केले. मात्र बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या डाव्या पंजाला तीन बोटे नाहीत, हाताचा डावा पंजा अर्धवट असून हात पूर्णपणे अपंग आहे. तसेच बाळाला संडास करण्याची जागा नाही. यामुळे जन्मलेल्या बाळाच्या जीवाला धोका झाला आहे. याचा अहवाल ससून रुग्णालयानेही दिला आहे. यावरून बाळाच्या जिविताला धोका निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड तपास करीत आहेत.

काही रुपयांच्या लालसेपोटी अशा प्रकारचे चुकीचे रिपोर्ट देणे अतिशय धोकादायक आहे. रुग्णांच्या जीवाशी तसेच त्यांच्या विश्वासाशी खेळण्याचा प्रकार यामुळे होत आहे. सर्व क्षेत्रात कमिशन संस्कृतीने थैमान घातले असून ती वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. डॉक्टरांकडे कोणत्याही लहान-मोठ्या आजाराविषयी विचारले तरी सुद्धा पैसे मागितले जातात. यापुढे जाऊन साधा ताप किंवा साधारण आजार असेल तरी सुद्धा मोठ-मोठ्या तपासण्या करायला लावल्या जातात. यामागे रुग्णांचे निदान करणे हा हेतू मुळीच नसतो तर केवळ असहाय आणि हतबल झालेल्या नातेवाईकांचा खिसा रिकामा कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.