WTC 2021 : भारताचा दुसरा डाव 170 धावांवर आटोपला, न्यूझीलंडला विजयासाठी 139 धावांची गरज

एमपीसी न्यूज – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात भारताचा दुसरा डाव 73 षटकात /170 धावांवर आटोपला. भारताकडून ऋषभ पंतने 88 चेंडूत 41 धावांची झुंजार खेळी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकण्यासाठी न्यूझीलंडला आता 53 षटकात 139 धावांची आवश्यकता आहे.

पाचव्या दिवसअखेर 2 बाद 64 धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने उपाहारापर्यंत विराट कोहली (13), चेतेश्वर पुजारा (15) आणि अजिंक्य रहाणेला (15) गमावले. हे स्टार खेळाडू स्वस्तात माघारी परतल्यानंतर ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सांभाळला. उपाहारापर्यंत भारताने 55 षटकात 5 बाद 130 धावा केल्या.

उपाहारानंतर पंतसोबत आलेल्या रवींद्र जडेजाला 16 धावांवर नील वॅगनरने तंबूचा रस्ता दाखवला. सत्तराव्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद झाला. बोल्टच्या गोलंदाजीवर तो वैयक्तिक 41 धावांवर माघारी परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार ठोकले. पंतनंतर बोल्टने अश्विनला टेलरकरवी झेलबाद केले. त्याने सात धावा केल्या. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने सर्वाधिक 4 बळी घेतले. बोल्टने 3, जेमीसनने 2 तर नील वॅगनरने 1 बळी घेतला.

चहापानापर्यंत न्यूझीलंडच्या संघाने सावध सुरुवात केली असून, संघाने दुसऱ्या डावात 8 षटकात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडला आता 45 षटकात 120 धावांची आवश्यकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.