XI Addmission: पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी आज अखेरचा दिवस

पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या 40 हजार 013 विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 453 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशांसाठीच्या प्रक्रियेतील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी 3 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत असल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या 40 हजार 013 विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 453 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, तर 25 हजार 009 विद्यार्थ्यांनी प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन केले आहे. प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्याने प्रवेश जाहीर होऊन आतापर्यंत प्रवेश घेऊन शकलेल्या विद्यार्थ्यांना आज प्रवेश घेता येईल.

पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेसाठी लॉगीनमध्ये प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशनवर क्लिक करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित महाविद्यालयात संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, प्रवेशपत्राची प्रत काढून ठेवावी. केवळ प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन केल्यावर प्रवेश निश्चित होत नाही हे लक्षात ठेवावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

तसेच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जायचे असल्यास किंवा अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांना अर्ज मागे घेता येईल. त्यासाठी व्ह्रिडॉवल ऑफ अ‍ॅडमिशनचा पर्याय संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीच्या रिक्त जागांची यादी 4 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 10 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार असून 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.