XI Admission CET : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! अकरावीची सीईटी 21 ऑगस्टला

एमपीसी न्यूज – दहावीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता अकरावीच्या सीईटी परीक्षेची तारीख अखेर आज जाहीर झाली आहे. 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना 20 जुलै (उद्या) सकाळी 11.30 वाजेपासून 26 जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

या परिक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.

सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देखील ऑनलाईन मिळणार आहेत. 100 गुणांची ही परीक्षा असणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. 100 गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.