Pimpri News : विश्वकल्याण कामगार संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी यशवंतभाऊ भोसले यांची वर्णी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, केंद्रीय राष्ट्रीय संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची विश्वकल्याण कामगार संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी निवड करण्यात आली. या निमित्ताने कामगारांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने मदत करण्याची ग्वाही भोसले यांनी यावेळी दिली.

विश्वकल्याण कामगार संघटना आकुर्डीतील बजाज ऑटो लिमिटेड कंपनीत सन 2003 पासून कार्यरत आहे. या संघटनेची स्थापना रावसाहेब शिंदे यांनी केली. या संघटनेकडून आजपर्यंत कामगार हिताची अनेक कामे करण्यात आले आहेत. आजही रावसाहेब शिंदे यांच्या तत्वांनीच संघटनेचे कामकाज चालते.

दरम्यान, सन 2007 मध्ये रावसाहेबांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बजाज ऑटो लिमिटेड येथे सन 2008 साली व्यवस्थापनाने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली. त्यामध्ये 2700 कामगारांपैकी जवळपास 2400 कामगार स्वेच्छानिवृत्ती घेऊन बाहेर पडले. जेमतेम 300 कामगार कंपनीत राहिले.

रावसाहेबांनंतरच्या काळात संघटनेस कमकुवत स्वरुपाचे नेतृत्व लाभले. अनेकदा चुकीच्या निर्णयांनी कामगारांचे खूप नुकसान सुद्धा झाले. संघटनेस कामागारांसाठी दीड ते दोन कोटी मोजावे लागले. प्रामाणिक सभासद, कार्यकर्ते, कमिटी सदस्य, कार्यकारिणी सदस्य यांना सापत्नभावाची वागणूक मिळत गेली आणि संघटनेच्या सभासदांवर अन्यायकारक वागणूक सुरु झाली.

युनियन स्थापनेपासून सोबत असणा-या पदाधिका-यांना युनियन मधून काढून टाकण्यात आले. स्वार्थी लोकांची टोळी तयार झाली, कोणतीही चूक नसताना अनेकांचे सभासदत्व रद्द केले. याला कंटाळून आकुर्डीतील कामगारांनी स्वतंत्र कामकाज करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे स्वतंत्र कमिटी, कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.

कामगार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले व तळागाळातील कामगारांसाठी तळमळीने काम करणारे, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, नॅशनल फ्रंट ऑफ इंडिया ट्रेड युनियन या राष्ट्रीय संघटनेच्या केंद्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी असलेले कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची संघटनेच्या मानसेवी सदस्यपदी निवड करण्यात आली. संघटनेला यापुढे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन राहणार आहे. याप्रसंगी संघटनेने त्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. याबाबतची माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब थोरवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.