YCMH News: वायसीएम रूग्णालयातील पदव्युत्तर संस्थेत आणखी चार नवीन अभ्यासक्रम

महापालिका राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे 20 लाख अदा करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाअंतर्गत दहा विषयांबरोबरच आता आणखी चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये श्वसनरोग चिकीत्साशास्त्र, कम्युनिटी मेडीसीन, त्वचारोग मेडीसीन आणि नेत्र चिकीत्साशास्त्र या नवीन अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

त्यासाठी प्रति विषयाकरिता पाच लाख रूपये याप्रमाणे २० लाख रूपये राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागाकडे अदा करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्यास परवानगी मिळाली आहे. शैक्षणिक वर्षे 2020-21 करिता विद्यार्थ्यांना प्रवेशक्षमता मंजूरीही दिली आहे.

त्यामध्ये मानसोपचार शास्त्र (3), विकृतीशास्त्र (3), बालरोग (4), अस्थिरोग (4), स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र (3), कान-नाक-घसा (3), भुलशास्त्र (4), मेडीसीन (6) आणि जनरल सर्जरी (6) या पदव्युत्तर पदवी अभ्यास्क्रमांना प्रवेश क्षमता मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागाच्या 3 फेब्रुवारी 2020 रोजीच्या पत्रानुसार, वायसीएम रूग्णालय पदव्युत्तर संस्थेत श्वसनरोग चिकीत्साशास्त्र, कम्युनिटी मेडीसीन, त्वचारोग मेडीसीन आणि नेत्र चिकीत्साशास्त्र हे चार नवीन अभ्यासक्रम प्रति विषय सहा विद्यार्थी प्रवेशक्षमतेसह सन 2020-21 पासून सुरू करण्याच्या अनुषंगाने सरकारकडे शिफारस प्राप्त झाली आहे.

या नवीन अभ्यासक्रमांच्या प्रस्तावांकरिता प्रस्ताव छाननी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, प्रत्येक पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता प्रति विषय पाच लाख रूपये इतके सक्षमता तपासणी शुल्क ठरविण्यात आले आहे.

त्यानुसार, चार अभ्यासक्रमांकरिता एकूण 20 लाख रूपये वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण संशोधन या लेखाशिर्षावर भरल्यानंतरच वायसीएम रूग्णालय पदव्युत्तर संस्थेची सक्षमता तपासणी करण्यात येणार आहे.

त्यासाठी ही रक्कम वैद्यकीय शिक्षण आणि औषधीद्रव्ये विभागाकडे भरावी लागणार आहे. हा खर्च ‘पी.जी.आय., वायसीएमएच, पीसीएमसी करिता विविध सरकारी नियामक संस्था व विद्यापीठांचे शुल्क भरणे’ या लेखाशिर्षावरील 1 कोटी 50 लाख रूपये तरतुदीतून करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.