YCMH News: ‘वायसीएमएच’मध्ये नियोजनबद्ध कोरोनाचे लसीकरण; नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात अतिशय नियोजनबद्ध कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम सुरु आहे. लसीकरणाचे प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. लसीकरणाला आलेल्या नागरिकांना सर्व व्यवस्थित माहिती दिली जाते. कोणताही त्रास होऊ दिला जात नाही. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचा-यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

महापालिकेचे संत तुकारामनगर येथे 800 खाटांचे वायसीएम रुग्णालय आहे. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील नागरिक उपचारासाठी वायसीएममध्ये येतात. कोरोना काळात वायसीएम रुग्णालयाची कामगिरी कौतुकास्पद आहे.

वायसीएमचा मृत्यूदर देखील कमी आहे. येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे अतिशय उत्तम नियोजन केले आहे. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून कर्मचा-यांचे कौतुक होत आहे.

याबाबत टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर म्हणाले, ”वायसीएम रुग्णालयात दोन मार्च रोजी लसीकरणाचे नियोजन नव्हते. ती सुरुवात होती. परंतु, त्यानंतर प्रशासनाने खूप सुधारणा केल्या. लसीकरणाच्या नियोजनात प्रचंड सुधारणा झाली आहे. माहितीचा फलक लावला असून गर्दीचे नियोजन व्यवस्थित केले जाते.

कर्मचारी जीव ओतून काम करत होते. दोन मार्चच्या आणि आजच्या नियोजनात खूप सुधारणा झाली आहे. दोन मार्चला सुरुवात होती. सर्वजण चाचपडत होते. परंतु, आता व्यवस्थित लसीकरणाचे कामकाज चालते. अत्यंत सुनियोजित, सुसूत्रपणे लसीकरण केले जाते. पहिल्या डोसची आणि दुस-या डोसची वेगळी रंग लावली होती. गजबलेले रुग्णालय असताना एक मजला फक्त कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राखीव ठेवला आहे”.

”सरकारी यंत्रणेला आपण केवळ नावे ठेवतो. परंतु, त्यांच्यासारखे दुसरे कोणीच चांगले काम करु शकणार नाही. या कामाबाबत वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांचे कौतुक केले पाहिजे. कोरोनाच्या महामारीतही ते काम करत आहेत. अशा वातावरणात वैद्यकीय कर्मचारी हिम्मतीने काम करत आहेत. त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे”, असेही पारळकर म्हणाले.

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद वाबळे म्हणाले, ”कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. एक मजला लसीकरणासाठी राखीव ठेवला आहे. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये. यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.