YCMH NEWS: वायसीएम रूग्णालय पदव्युत्तर संस्थेसाठी मानधनावर 35 पदांची भरती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी उत्तम दर्जाची रूग्णसेवा, कोरोना महामारीदरम्यान जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन 35 पदांची हंगामी स्वरूपात तीन वर्षे कालावधीकरिता भरती करण्यात येणार आहे. या पदांना दरमहा मानधनापोटी 32 लाख रूपये खर्च होणार आहे. याशिवाय प्राध्यापक संवर्गातील 14 आणि शिक्षकेतर 13 अशी एकूण 28 मानधनावरील पदांची भरती करण्यास महासभेने मान्यता दिली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्यास परवानगी मिळाली आहे. वायसीएम रूग्णालयासाठी स्थायी आस्थापनेवरील गट अ आणि ब मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या मौखिक मुलाखती घेऊन 118 मंजुर पदांपैकी 74 पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली होती. या प्रक्रीयेअंतर्गत आजपर्यंत 58 अध्यापक पदव्युत्तर संस्थेत स्थायी आस्थापनेवर कार्यरत आहेत.

शासन मंजुर 118 पदांपैकी महापालिका सभेने यापूर्वी 90 पदांना तीन वर्षे कालावधीकरिता हंगामी स्वरूपात भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे. उर्वरीत 28 पदांपैकी 14 पदे ही प्राध्यापक संवर्गातील आहेत. तर, 14 पदे शिक्षकेतर आहेत. सध्या वायसीएम रूग्णालयात नऊ विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला असून नवीन चार विषय प्रस्तावित आहेत.

आगामी वर्षात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची तपासणी अपेक्षित आहे. उत्तम दर्जाची रूग्णसेवा, संस्थेचे विस्तारीकरण तसेच कोरोना महामारीदरम्यान मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेता 35 पदांची भरती हंगामी स्वरूपात तीन वर्षे कालावधीकरिता करण्यासाठी 4 जून 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

ही रिक्त पदे भरण्यासाठी 4 जून 2021 ते 21 जून 2021 अखेर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या अर्जांची निवड समितीमार्फत छाननी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांची 5 जुलै ते 7 जुलै 2021 या कालावधीत मौखिक मुलाखती घेऊन निवड समितीमार्फत गुणांकनानुसार विविध विषयातील 13 अध्यापकांची निवड समितीने निवड केली आहे.

ही निवड झालेल्या 13 अध्यापकांपैकी नऊ अध्यापक रुजू झाले आहेत. दोन अध्यापक प्रतिक्षा यादीतील आहेत. उर्वरीत 24 पदे रिक्त राहिली आहेत. ही पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे. त्यासाठी दर सोमवारी मौखिक मुलाखतीद्वारे ही पदे भरण्यास महापालिका सभेची मान्यता घेण्यात येणार आहे. या पदांना दरमहा मानधनापोटी 32 लाख 32 हजार रूपये इतका खर्च होणार आहे.

तसेच 14 शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकानुसार, विविध विभागामध्ये कामकाज सुरळीतपणे चालविण्याकरिता आवश्यक आहेत. ही पदे तीन वर्षे कालावधीसाठी हंगामी स्वरूपात मानधनावर भरण्यात येणार आहेत. त्यानुसार, या 28 पदांनाही महासभेने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.