Rain News : पुणे जिल्ह्यात रविवारपर्यंत यलो अलर्ट;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात रविवारपर्यंत यलो अलर्ट असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीत यलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी केले आहे.

या कालावधीत वीजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी :

  1. वीजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून विद्युत स्रोतापासून अलग करून ठेवावीत.
  2. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
  3. वीजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये.घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
  4. वीजेच्या खांबांपासून लांब राहावे.
  5. वीजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
  6. वीजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यांमध्ये डोके घालून वाकून बसावे
  7. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

 

मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी:

  1. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर जाणे टाळा.घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
  2. अति मुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.
  3. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.
  4. पाऊस पडत असताना वीजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईल व संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे.अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
  5. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपातकालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (020) 26123371 किंवा टोल फ्री 1077 ला संपर्क करावा.
  6. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्याwww.imdmumbai.gov.inया संकेतस्थळावरून घ्यावी.
  7. कुठली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
  8. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पुर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे.
  9. आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र या ठिकाणी आपण राहत असल्यास प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
  10. पूर प्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
  11. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी ठिकाणी जाऊ नये.
  12. अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी- नाले इत्यादी ठिकाणी जाऊ नये.
  13. अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी.
  14. पुराच्या पाण्याजवळ अथवा नदीपात्रात उभे राहून नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.
  15. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.