Yerwada News : मागील 12 वर्षांपासून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा बुधवारी लिलाव

एमपीसी न्यूज – येरवडा पोलिसांनी सन 2008 पासून जप्त केलेल्या 9 वाहनांचा बुधवारी (दि. 2 सप्टेंबर) लिलाव करण्यात येणार आहे. वाहनांच्या मूळ मालकांचा शोध न लागल्याने तसेच कुणीही वाहनांवर हक्क न सांगितल्याने हा लिलाव करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

येरवडा पोलिसांनी सन 2008 पासून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अनेक वाहने जप्त केली आहेत. त्यातील काही वाहन मालकांचा शोध लागला, तर काही वाहन मालकांनी वाहनांवर आपला मालकी हक्क दाखवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहने सोडवून नेली आहेत. मात्र जप्त केलेल्या 9 वाहनांवर कोणीही मालकी हक्क सांगितलेला नाही. तसेच पोलिसांना देखील वाहनांच्या मूळ मालकांचा शोध लागलेला नाही.

_MPC_DIR_MPU_II

या वाहनांची यादी येरवडा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. आजपर्यंत या वाहनांवर कोणीही हक्क सांगण्यासाठी समोर आलेले नाही. ही वाहने खूप दिवसांपासून पडून असल्याने गंजलेली व खराब झालेली आहेत. या 9 दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लिलावासाठी कायदेशीर परवानगी मिळाली आहे. दरम्यानच्या काळात आणखी वाहनांच्या लिलावाची परवानगी मिळाल्यास त्यांचा देखील लिलाव बुधवारी (दि. 2) करण्यात येणार आहे.

ही लिलाव प्रक्रिया वाहतूक शाखा कार्यालय, बंगला नंबर 5, एअरपोर्ट रोड, येरवडा पुणे येथील आवारात सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.