Manobodh : मनोबोध भाग 100 – येथासांग रे कर्म तेही घडेना

Manobodh by Priya Shende Part 100 :

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 100

येथासांग रे कर्म तेही घडेना

घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना

दया पाहता सर्वभूती असेना

फुकाचे मुखी नाम तेही वसेना

https://youtu.be/otnxCFFxaAk

या श्लोकात समर्थ सांगताहेत की परमेश्वर प्राप्तीसाठी माणूस खूप काही करायचा प्रयत्न करतो. पण तो व्यर्थ जातो आणि जे सहज साधं सोपं करण्यासारखा आहे तेच करत नाही, तर त्याच्या गाठीशी पुण्य कसं पडणार?

प्रत्येकाला वाटत असतं की आपला पुण्यसंचय व्हावा. आपल्याला सद्गती मिळावी. पण त्यासाठी धर्मशास्त्रानुसार काही करावं, तर त्याचं पूर्ण ज्ञान नसतं. नीट कर्मकांड माहीत नसतं. अर्धवट काहीतरी करून त्याचे फळ कसं मिळेल? त्यासाठी (Manobodh) वेगळे वेगळे जे मार्ग आहेत ते करण्याचा तो प्रयत्न करतो. पण एक काही धड त्याच्या हातून पूर्ण घडत नाही. त्यामुळे एक न धड भाराभर चिंध्या अशी त्याची अवस्था होते.

धर्मशास्त्र प्रमाणे जी कर्म सांगितली आहेत, वर्तवैकल्यं सांगितली आहेत, तीर्थयात्रा सांगितली आहे. जे यज्ञ, सत्संग, उपास तपास, दानधर्म, किर्तन-भजन, सेवा सांगितली आहे ती तर माणसाच्या हातून होत नाही, त्यामुळे त्याचं फळही मिळत नाही.

प्रत्येक मार्गात काहीतरी अडचणी उद्भवतात. विधीवत व्रत वैकल्य करायची म्हटली तर त्याला शारीरिक कष्टं लागतात. पैसा लागतो. या अडचणी लक्षात घेता अशी कर्म मग यथासांग होत नाहीत. ती केवळ करायची म्हणून माणूस करतो. बरं ह्यात सुद्धा भाव कमी, भक्ती कमी आणि दिखाऊपणाच जास्त. श्रद्धा नाही. आपली श्रीमंती दाखवणे हा उद्देश. पूजा विधीपेक्षा आलेल्या पाहुण्यांची सरबराई, त्यांचा मानपान, आहेर यात जास्त लक्ष असतं. त्यामुळे शास्त्राने सांगितलेली कर्म यथा सांग पार पडत नाहीत. त्यामुळे त्याचे फळही मिळत नाही. म्हणून समर्थांनी म्हटले की, “येथासांग रे कर्म तेही घडेना”.

पुढे ते म्हणताहेत की “घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना” दानधर्म करूनही परमेश्वर प्राप्ती करता येते. पुण्यसंचय करता येतो. पण यात अडचण अशी आहे की दानधर्म करण्यासाठी आपल्याकडे आधी ते असायला तर हवं? (Manobodh) दुसरं म्हणजे आपल्याकडे आहे ते दान करतोय ते निरपेक्ष मनाने, उदार भावाने दान म्हणून करायचं असतं. त्याच्या बदल्यात माझं कशाला नाव द्या किंवा माझा मोठेपणा जगाला सांगावा, टॅक्समध्ये बेनिफिट मिळतोय म्हणून… तर असा काही उद्देश नसावा. याने अहंपणा वाढतो..तर या उलट आपल्या संपत्तीवरची आसक्ती कमी व्हावी म्हणून दान करावं, अशी भावना नसेल आणि नुसता मोठेपणा मिळवण्यासाठी दान करत असाल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे यातूनही पुण्य मिळणार नाही.

पुढे समर्थ म्हणताहेत की, “दया पाहता सर्वभूती असेना”. जसं कर्मकांड, व्रतवैकल्य, दानधर्म हे पुण्यसंचायाचे, परमेश्वरप्राप्तीचे मार्ग आहेत. त्याचप्रमाणे सेवा, दयाभाव हे देखील परमेश्वर प्राप्तीचच अजून काही मार्ग आहेत. गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची सेवा करणे, त्यांना आपलंसं करणे. प्राण्यांवर दया करणे, हा देखील ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहेच. पण असं घडत नाही. होतं कसं की माणूस अत्यंत स्वकेंद्रित होतो. तो फक्त स्वतःवर प्रेम करतो. फार फार तर आपल्या कुटुंबावर, जवळचे नातेवाईक किंवा मित्रांवर प्रेम करतो. सगळ्यांवर एकसारखं प्रेम, मदत, दया तो करू शकत नाही. मग या पण मार्गाने गाठीस काही पडत नाही.

पुढे समर्थ म्हणतात की, “फुकाचे मुखी नाम तेही वसेना”. म्हणजे आत्तापर्यंत पाहिलेल्या मार्गांपेक्षा, त्यातल्या अडचणींपेक्षा, सगळ्यात सोपा सहज उत्तम मार्ग म्हणजे रामनामाचा आहे. मुखी रामनाम असणे.. इतका बिनकष्टाचा आणि फुकटाचा आहे, की त्यासाठी कष्ट नाही. पदरचे पैसे खर्च होत नाहीत. तरीसुद्धा माणूस त्याचा कंटाळा करतो. त्याऐवजी इकडे तिकडे वेळ घालवतो. पण सहज सोपा, सहज साध्य होणारा नामस्मरणाचा मार्ग अंगिकारत नाही. (Manobodh)त्यामुळे त्याला त्याचंही फळ मिळत नाही. एकाच वेळी अनेक गोष्टी करायला घेतल्यामुळे एक काही धड होत नाही. हाती काही पडत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात की एकच मार्ग निवडा. तो म्हणजे नामस्मरणाचा. रामनामाचा. जो की फुकट आहे. सहज सोपा आणि खात्रीशीर आहे ते घ्यायचा समर्थ आग्रह धरतात.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.