Yogi Adityanath News: आग्रा येथे उभारले जात असलेल्या मुघल म्युझियमचे आता ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ असे नामकरण

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने आग्रा येथे उभारल्या जात असलेल्या मुघल म्युझियमचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय नावाने ओळखलं जाईल.

ताजमहलमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या आग्रा शहरात सध्या मुघल म्युझियमचे बांधकाम सुरू आहे. परंतु योगी आदित्यनाथ सरकारने आता या म्युझियमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

हे मुघल म्युझियम आता मुघलांना आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. आग्रा येथील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.

अलाहाबादचे नामांतर प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या, मुघलसरायचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्रा येथील मुघल म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केलं जाणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात नामांतराचे राजकारण पुन्हा सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी लिहिलं आहे की, “आग्रा येथे उभारण्यात येत असलेले म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचे कोणतेही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत.”

ताजमहलच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर बनत असलेल्या मुघल म्युझियमला 2015 मध्ये अखिलेश सरकारच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे. संग्रहालयाच्या नामांतराचा निर्णय घेऊन योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्त्वाचं राजकारण आणखी मजबूत कऱण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संग्रहालयाला देऊन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने या संग्रहालयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैभव संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारने पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या संग्रहालयात मराठा साम्राज्याच्या सर्व वस्तू प्रदर्शनाला ठेवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.